Maratha Reservation
Maratha Reservation

    Maratha Reservation : आज मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला जवळजवळ सर्व पक्षांचे नेते उपस्थित होते. या बैठकीला ३२ जण उपस्थित होते, सर्व गोष्टींवर विस्तृत चर्चा झाली. या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यावर सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत झाले आहे, तर मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही सरकारचीदेखील भूमिका आहे.

    मनोज जरांगे यांनी सरकारला सहकार्य करावे
    राज्यातील सर्व पक्ष एकत्रित काम करण्यासाठी तयार आहे. इतर समाजावर अन्याय न होता मराठ्यांना आरक्षण मिळावे, असे आमचे याबाबत सर्वांचे एकमत झाले. मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोग युध्द पातळीवर काम करत आहे, मनोज जरांगे यांनी सरकारला थोडा वेळ द्यावा, मराठा समाजाने संयम राखावा, मनोज जरांगे यांनी सरकारला सहकार्य करावे ही सर्वपक्षीय नेत्यांची भावना असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
    आम्ही टिकणारं आरक्षण देणार
    आम्ही टिकणारं आरक्षण देणार असून सरकार सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. आम्ही आरक्षणांच्या बाजूने आहोत. सुप्रीम कोर्टात क्युरीटिव्ह पिटिशन दाखल केली आहे. ३ निवृत्त न्यायाधिशांची समिती गठित करण्यात आली आहे, सरकारला थोडा वेळ द्यावा, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
    सकल मराठा समाजाने सहकार्य करावे
    मराठा समाजाने थोडा संयम बाळगावा. सरकारला थोडा वेळ द्यावा, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे, आणि सहकार्य करावे. आमच्यावर विश्वास ठेवा. आम्हाला सहकार्य करा. सर्वसामान्य माणसाला अविश्वास वाटता कामा नये, सकल मराठा समाजाने सहकार्य करावे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
    राज्यात कायदा सुव्यवस्था आणि शांतता अबाधित राहावी यासाठी सर्व पक्षांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी आजच्या बैठकीत सर्वपक्षीय ठराव करण्यात आला आहे, अशीही माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.