राज्यपालांच्या विधानाशी सहमत नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याशी सहमत नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली आहे.

    मालेगाव: राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या नाशिकमध्ये (CM Eknath Shinde In Nashik) आहेत. मालेगावमध्ये पत्रकार परिषद (CM Press Conference) घेत त्यांनी आपण राज्यपालांच्या मताशी सहमत नसल्याचं सांगितलं आहे.

    ‘कधी कधी मी इथं लोकांना म्हणतो की, महाराष्ट्रात विशेष करुन मुंबई, ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढा, तर तुमच्याकडे पैसाच राहणार नाही. तुम्ही जे मुंबईला आर्थिक राजधानी म्हणताय ती राजधानी राहणारच नाही’, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor BhagatSingh Koshyari) यांनी म्हटलं आहे. या वक्तव्यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपालांच्या वक्तव्यावर ते म्हणाले की राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याशी मी सहमत नाही. असंही ते म्हणाले. (CM Eknath Shinde Vs Governor Bhagatsingh Koshyari)

    राज्यपालांचं वक्तव्य हे त्यांचं वैयक्तिक मत आहे. त्यांच्या वक्तव्याशी अजिबात सहमत नाही. मराठी माणसांमुळं मुंबई, महाराष्ट्राला वैभव मिळालेलं आहे. राज्यपाल हे मोठं संविधानिक पद आहे. कुणाचाही अवमान होणार नाही याची काळजी त्यांनी घ्यायलाच हवी. मराठी माणसांचं योगदान कुणालाही नाकारता येणार नाही. मराठी माणसाच्या मेहनतीवरच मुंबई देशाची आर्थिक राजधानी झाली आहे, असंही ते म्हणाले.

    दरम्यान नाशिकमध्ये सगळ्या विभागांची बैठक घेतली असल्याचं शिंदे यांनी सांगितलं आहे. रस्त्यांच्या विकासाकडे लक्ष देणार असल्याचंही ते म्हणाले. कृषी विद्यापीठे सक्षम करण्यावर भर असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.