मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज भंडारा दौरा, अनेक प्रकल्पांची करणार पाहणी

गोसेखुर्द धरणात एमटीडीसीकडून सुरू करण्यात येणाऱ्या जल पर्यटन प्रकल्पाची पाहणीही करणार आहेत.

    भंडारा : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भंडार दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आज गोसेखुर्द धरणाला (Gosikhurd Dam) भेट देणार आहे. यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि प्रशासनातील इतर अधिकाऱ्यांकडून गोसेखुर्द धरणाच्या कामासंदर्भात माहिती घेणार आहेत. यासोबतच गोसेखुर्द धरणात एमटीडीसीकडून सुरू करण्यात येणाऱ्या जल पर्यटन प्रकल्पाची पाहणीही करणार आहेत.

    भंडारा जिल्ह्यासाठी मोठी ओळख ठरलेल्या गोसेखुर्द धरणाचं (Gosikhurd Dam) बांधकाम पूर्ण झालं असलं तरी शेतकऱ्यांच्या बांधावर पूर्ण क्षमतेने पाणी पोहोचलेलं नाही. त्यामुळे अद्यापही या परिसरातील शेतकीर पाण्याच्या प्रतिक्षेतच आहेत. त्याच गोसेखुर्द धरणाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आज मुख्यमंत्री भंडाऱ्यात आले आहेत.

    विविध विकास कामांची करणार पाहणी

    गोसेखुर्द धरण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटनासह जोखीम क्षेत्रातील 26 गावांचे पुनर्वसन आणि भंडारा रोड ते भंडारा शहरापर्यंत मेट्रोला मंजुरी अशा सुमारे 900 कोटी रुपयांच्या विकास कामांना गेल्या महिन्यांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली होती. यासोबतच गोसेखुर्द धरण आणि बॅक वॉटर क्षेत्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ व जलपर्यटनाला बैठकीत मान्यता देण्यात आली होती. या जलपर्यटनातून दहा हजार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचा दावा प्रकल्पाच्या आराखड्यात करण्यात आला होता. या विकासकामांमध्ये सभोवतालच्या परिसराचे सौंदर्यीकरण, उजव्या आणि डाव्या कालव्याचे सौंदर्यीकरण, वैनगंगा नदीतीरावर सौंदर्यीकरण, भंडारा ते आंभोरा व गोसे धरणापर्यंत जलपर्यटन, रिसॉर्ट, क्रुज हाऊसबोर्ड, सी बोट, मरीना आणि रॅम्प, बम्परराईड, फ्लाईंग फीश, जेटाव्हेटर, पॅरासिलिंग आधी सुविधांसाठी 315 कोटी खर्च अपेक्षित आहे.