मुख्यमंत्री शिंदे यांचा जरांगे पाटील यांच्याशी फोनवरून संवाद; काय झाली चर्चा ?

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटी या गावात उपोषणाला बसलेले नेते मनोज जरांगे पाटील यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी फोनवरून संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगे पाटील यांच्या तब्येतीची चौकशी केली, तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा अनुषंगाने या दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाली.

    मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटी या गावात उपोषणाला बसलेले नेते मनोज जरांगे पाटील यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी फोनवरून संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगे पाटील यांच्या तब्येतीची चौकशी केली, तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा अनुषंगाने या दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाली.

    यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे देण्याबाबत आजच्या कॅबिनेटमध्ये ठोस निर्णय घेण्यात येणार असल्याचे जरांगे पाटील यांना सांगितले. तसेच मराठा आरक्षणाचा प्रश्न कायदेशीररित्या सोडवणे गरजेचे असून, त्यासाठी शासनाने सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केली आहे. या पिटीशनवर सुनावणी घ्यायला न्यायालयाने होकार दिलेला आहे. त्यामुळे मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीत बसणारे आणि कायम टिकणारे आरक्षण मिळवून देण्याबाबत शासन पूर्णपणे सकारात्मक असल्याचे यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी समाधानकारक चर्चा झाल्यामुळे जरांगे पाटील यांनी नंतर पाणीही घेतले.