
मला माझ्या शिवसैनिकांनी सांगितलं तर मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यासाठी तयार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सांगितलं आहे.
मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी सुरतमध्ये जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. मात्र, या चर्चेतून अद्याप कोणताही मार्ग निघाला नसून चर्चा निष्फळ ठरल्याचं दिसत आहे. यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे फेसबुक लाईव्हद्वारे (CMO Maharashtra Facebook Live) महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. मला माझ्या शिवसैनिकांनी सांगितलं तर मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यासाठी तयार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. शिवसेना पक्ष प्रमुख पदही सोडण्यास तयार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मला पदाचा मोह नाही. वर्षा सोडून आजच मातोश्रीवर जाण्याची माझी तयारी आहे. मी संकटाला सामोरा जाणारा शिवसैनिक आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह दरम्यान सांगितलं की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा माझ्यावर अजुनही विश्वास आहे. मात्र माझ्या शिवसैनिकांचा माझ्यावर विश्वास नसेल तर मी मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहे. बंडखोर आमदारांनी फक्त मला तसं सांगावं मी लगेच पद सोडेन, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. मी पद सोडल्यानंतर शिवसैनिक मुख्यमंत्री होत असेल तर त्याबद्दल आनंदच होईल, असंही ते म्हणाले. माझेच लोक माझ्यावर अविश्वास दाखवत आहेत, याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. बंडखोरांनी माझ्या राजीनाम्याचं पत्र राज्यपालांना द्यावं, असंही ते म्हणाले.