मुख्यमंत्र्यांनी जागतिक संमेलनात आठवले स्टाईलने केली कविता

मराठी माणूस कुठेही गेला तरी त्याचे मन रांगड्या मातीत अडकलेले असते. जात-पात-धर्मापलिकडे जाऊन शिकवण देतात ती आपली मराठी माणसं आहे.

    वसई । रविंद्र माने : दाढी की किमयादृष्टोंका किया सफाया, अशी आठवले स्टाईल कविता म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरारमधील १९ व्या जागतिक मराठी संमेलनाचे उद्घाटन केले.

    जागतिक मराठी एकादमी, वि.वा.चॅरिटेबल ट्रस्ट आणि साहित्य जल्लोष यांच्या संयुक्त विद्यमाने १९ व्या जागतिक मराठी संमेलनाला शनिवारी विरारच्या विवा काॅलेजमध्ये सुरुवात झाली. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी जपानचे आमदार योगेंद्र पुराणिक तर स्वागताध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकुर हे देखील उपस्थित होते. यावेळी केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे उपस्थित होते. सकाळी १० वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होते. मात्र, मुख्यमंत्री तब्बल ३ तास उशिरा आले. दरम्यान, जेष्ठ पत्रकार संजीवनी खेर यांची साहित्यिका सिसिल्या कार्व्हालो आणि राजेश चोरमारे यांनी प्रकट मुलाखत घेतली. तर डाॅ.जगन्नाथ पाटील यांनी योगेंद्र पुराणिक यांची मुलाखत घेतली.

    यावेळी उपस्थितांना नारायण राणे यांनी जपानमध्ये जाऊन त्यांची टेक्नाॅलाॅजी शिका आणि ती भारतात आणा, अल्पसंतुष्ट राहू नका, दारात गाडी आली म्हणजे आपली प्रगती संपली असे समजून संतुष्ट होऊ नका असे आवाहन केले आहे. मराठी माणसाची प्रगती होण्याच्या दृष्टीने हे संमेलन यशस्वी व्हावे अशा शुभेच्छा यावेळी दिल्या. तर नोकऱ्या देणारी तरुण पिढी घडावी यासाठी हे संमेलन भरवण्यात आल्याची माहिती जागतिक मराठी एकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली. दुपारी १ वाजता मुख्यमंत्र्यांचे संमेलनस्थळी आगमन झाले.

    मराठी माणूस कुठेही गेला तरी त्याचे मन रांगड्या मातीत अडकलेले असते. जात-पात-धर्मापलिकडे जाऊन शिकवण देतात ती आपली मराठी माणसं आहे. साहित्य संमेलनातून मराठी भाषेचा जागर होत असतो, आम्ही ही विकासाच्या माध्यमातून मराठी मने जोडण्याचा प्रयत्न करीत आहोत. न्याय देणारा विकसित महाराष्ट्र आम्हाला घडवायचा आहे. एकनाथ शिंदे यांनी वसई-विरारच्या विधायक कामासाठी हात आराखडा घेतला जाणार नाही अशी ग्वाही यावेळी दिली. तसेच त्यांनी व्यासपिठावर उपस्थित असलेले रामदास फुटाणे यांनी त्यांच्यावर केलेल्या कवितेची आठवण करुन देत फुटाणे यांना कोपरखळी मारली.

    दाढी खाजवित ते म्हणाले, आमच्या दृष्टीने हाच खरा संकल्प आहे, ५० आमदारांचे पुनर्वसन हाच खरा प्रकल्प आहे. या फुटाणे यांच्या कवितेला शिंदे यांनी रामदास आठवले यांच्या स्टाईलमध्ये उत्तर दिले. यही है दाढी की किमया दृष्टोंका किया सफाया. माझ्या दाढीत अनेकांच्या नाड्या आहेत, दाढीवर हात फिरवला तरी मी कोणाचा घात केला नाही. अशी सफाई ही त्यांनी यावेळी दिली.