बेकायदेशीर प्रियांका प्ले हाऊस बंद करा ; कराडच्या कोयना कॉलनीतील नागरिकांची मागणी, पालकमंत्र्यांसमोर मांडली कैफियत

कराड कोयना कॉलनीतील कोयना सहकारी दुध पुरवठा संघाचे सेवकांची सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. कराड येथे बेकायदेशीर सुरू असलेले प्रियांका प्ले हाऊस बंद करून शिक्षण विभाग, कराड नगरपालिका, पालक, विद्यार्थी व सोसायटी सभासद, रहिवासी यांची फसवणूक केल्या प्रकरणी कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे केली

  कराड : कराड कोयना कॉलनीतील कोयना सहकारी दुध पुरवठा संघाचे सेवकांची सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. कराड येथे बेकायदेशीर सुरू असलेले प्रियांका प्ले हाऊस बंद करून शिक्षण विभाग, कराड नगरपालिका, पालक, विद्यार्थी व सोसायटी सभासद, रहिवासी यांची फसवणूक केल्या प्रकरणी कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे केली.

  पालकमंत्री शंभूराज देसाई कराड दौऱ्यावर असताना येथील शासकीय विश्रामगृहावर कोयना कॉलनीतील महिला व नागरिकांनी पालकमंत्र्यांसमोर आपली कैफियत मांडली. यावेळी याप्रकरणी सविस्तर चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी प्रांताधिकारी यांना दिले आहेत. तसा अहवाल तात्काळ सादर करण्याच्या सूचनाही दिल्या. यावेळी कॉलनीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

  कोयना कॉलनीतील कोयना सहकारी दुध पुरवठा संघाचे सेवकांची सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. कराड या नावाने दि. १५ मार्च १९७१ साली नोंदणीकृत आहे. या सहकारी गृहनिर्माण सोसायटीचे सुमारे ३४ सभासद आहेत. सोसायटीच्या उपविधीतील कलम व नियम सदर गृहनिर्माण संस्थेचे सर्व सभासद यांचेवर बंधनकारक आहेत. त्यानुसार येथे वास्तव्य करणाऱ्यांना सोसायटीच्या घटनात्मक तरतुदीनुसार येथील जमीन क्षेत्र फक्त निवासी (राहण्यासाठी) वापर करता येणार आहे. अन्य कोणत्याही व्यवसायिक कारणासाठी वापर करता येणार नाही, स्पष्टपणे नमूद केले आहे. सदर सोसायटीचे घटनेतील उपविधी २४ (ब) मधील तरतुदीनुसार “सभासदास / नाममात्र सभासदास मुळ सभासदांच्या संमत्तीने संस्थेच्या परवागीने आणि संस्थेने घालून दिलेल्या अटी व शर्ती यांना पात्र राहून भु-भागावर राहणेचा अधिकार राहील.” अशी सोसायटीचा घटनेची तरतूद असल्याचे नागरिकांनी पालकमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिले.

  याशिवाय कोणत्याही शैक्षणिक विभागाकडून लेखी परवागी न घेता सोसायटीत निवासी वापराकरिता असलेल्या राहत्या घरी “प्रियांका प्ले हाऊस” या नावाने व्यवसाय बेकायदेशीररित्या चालू केलेला आहे. सदर प्ले हाऊस चालवताना शैक्षणिक धोरण, नियमावलीची पायमल्ली केली आहे. येथे १०० हुन अधिक मुलांना एकाच खोलीत शिकवले जाते. शैक्षणिक धोरणानुसार कोणत्याही सुविधा येथे नाहीत. एका मुलास सुमारे २० हजाराहून अधिक फी आकारली जात आहे. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी असल्याने सोसायटीत वाढलेली पालकांची वर्दळ, विद्यार्थ्यांचा गोंगाट, वाढते अपघाताचे प्रमाण यामुळे सोसायटीचे शांतता भंग झाली असून येथील वयोवृद्ध नागरिकांना त्याचा त्रास होत असल्याचे कैफियत नागरिकांनी मांडली.

  दि. ११ ऑक्टोबर २०२२ रोजी वार्षिक सर्व साधारण सभेमध्ये चर्चा होवून सभेचे ठराव नंबर ७/४ नुसार दि. ३० एप्रिल २०२३ पर्यंत प्ले हाऊस दुसरीकडे हालविणेबाबत मुदत दिली. तसेच दि. ०१ मे २०२३ नंतर प्रवेश घेवू नये, असा ठरावही करण्यात आहे. मात्र प्रियांका प्ले हाऊस साठी २०२३-२४ या साला करिता विद्यार्थ्यांना प्रवेश देणे चालू केले आहे.

  प्रियांका प्ले हाऊसच्या चालक विमल पंकज ठक्कर यांचे कृत्य पुर्णतः सोसायटीचे सभासदाच्या हिता विरूध्द व सभासदांना उपद्रव होईल असे आहे. ठक्कर यांनी शिक्षण विभाग, विद्यार्थी, पालक, कराड नगरपालिका यांच्यासह सोसायटीची दिशाभूल व फसवणूक केल्या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, सोसायटीच्या घटनेतील तरतुदीनुसार कारवाई करून सभासदत्व रदद् करणेत यावे, सदरचे बेकायदेशीर प्रियांका प्ले हाऊस तातडीने बंद करण्यात यावे, कराड पालिकेला रहिवाशी कर भरून प्ले हाऊसच्या माध्यमातून व्यवसाय कर बुडवला आहे तो वसूल करावा, अशा मागण्याचे निवेदन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.