शहर शिवसेनेचे साताऱ्यात मुख्याधिकार्‍यांना निवेदन; रस्त्यातील खड्डे बुजवण्याची केली मागणी

सातारा शहरात ठिकठिकाणी पडलेले खड्डे आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तातडीने भरण्यात यावेत, अशी मागणी शिवसेना शहराध्यक्ष बाळासाहेब शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निवेदनाद्वारे सातारा पालिकेकडे केली आहे. हे मागण्यांचे निवेदन सातारा पालिकेचे अतिरिक्त मुख्य अधिकारी पराग कोडगुले यांना सादर करण्यात आले.

    सातारा : सातारा शहरात ठिकठिकाणी पडलेले खड्डे आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तातडीने भरण्यात यावेत, अशी मागणी शिवसेना शहराध्यक्ष बाळासाहेब शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निवेदनाद्वारे सातारा पालिकेकडे केली आहे. हे मागण्यांचे निवेदन सातारा पालिकेचे अतिरिक्त मुख्य अधिकारी पराग कोडगुले यांना सादर करण्यात आले.

    या निवेदना संदर्भात बाळासाहेब शिंदे संघटक प्रणव सावंत सागर धोत्रे, राहुल जाधव, गणेश अहिवळे, सादिक बागवान, इम्रान बागवानं, रविंद्र भणगे, सुनील भोसले, सुमीत नाईक, आझाद शेख इत्यादी, शिवसैनिकांनी कोडगुले यांची भेट घेतली.

    बाळासाहेब शिंदे म्हणाले, सातारा शहरात वर्दळीच्या रस्त्यांसह सेवा रस्ते सुद्धा पावसामुळे खचले असून त्या ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकांची प्रचंड अडचण होत आहे, हे खड्डे मुरुमाने नियमित पद्धतीने भरण्यात यावे, त्याचे रोलिंग व्यवस्थित झाल्यानंतर रस्ता समतल असावा, अशी मागणी अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले यांच्याकडे केली. तसेच दिव्यांग निधीचा पूर्ण वापर व्हावा त्यांच्या रोजगारा संदर्भात सातारा पालिकेने सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले

    सातारा पालिकेच्या बांधकाम विभागाचे अभियंता सुधीर चव्हाण यांना पाचारण करण्यात आले, त्यावेळी चव्हाण म्हणाले की, या संदर्भातील दोन प्रस्ताव तातडीने मजूर सेवा सोसायटीकडे देण्यात आले असून, त्याची मंजुरी झाल्यानंतर शहरातील रस्ते व सेवा रस्ते यातील खड्डे मुरुमाने व्यवस्थित रीतीने भरून घेतले जातील. तसेच पूर्ण पावसाळा संपल्यानंतर बीबीएम पद्धतीने रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. मुरूम आणि खड्डे भरून त्याचे पिचिंग करणे, याकरिता २० लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे, असे मुख्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

    याशिवाय दिव्यांग निधी खर्च करणे, सातारा पालिकेला क्रमप्राप्त आहे. त्यांच्या रोजगाराच्या दृष्टीने त्यांना थेट मदत करता येणार नाही, पण सातारा पालिकेच्या गाळ्यांचा लिलाव चालू आहे. त्यामध्ये ते सहभागी होऊन रोजगारासाठी गाळा प्राप्त करू शकतात त्या संदर्भात त्यांना सहकार्य केले जाईल, असे कोडगुले यांनी शिवसैनिकांशी बोलतांना सांगितले.