ऐन दिवाळीत सिटीलिंकचे कर्मचारी पुकारणार संप?; वाहकांना बोनस नसल्याने कर्मचारी संतप्त

सिटीलिंक कंपनीने (CityLink) विद्यमान वाहक पुरविणाऱ्या ठेकेदाराला शह देण्यासाठी दुसरा भिडू नेमण्याची तयारी केली होती. नागपूर येथील कंपनी त्यास पात्रही ठरली. त्यामुळे लवकरच दुसरा ठेकेदार उपलब्ध होईल, अशी चिन्हे होती.

    नाशिक : सिटीलिंक कंपनीने (CityLink) विद्यमान वाहक पुरविणाऱ्या ठेकेदाराला शह देण्यासाठी दुसरा भिडू नेमण्याची तयारी केली होती. नागपूर येथील कंपनी त्यास पात्रही ठरली. त्यामुळे लवकरच दुसरा ठेकेदार उपलब्ध होईल, अशी चिन्हे होती. पण दुसरा ठेकेदार एक कोटी रुपयांची अनामत रक्कम भरण्यास वेळकाढूपणा करत असल्याने या प्रक्रियेची अवस्था बिकट झाली असून, आता दिवाळीनंतरच नवा ठेका प्रक्रिया मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहे.

    विद्यमान ठेकेदाराकडून वाहकांना बोनस मिळाला नसल्याने वाहक ऐन दिवाळीत संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे प्रवाशांना ऐन दिवाळीत याचा त्रास होण्याची शक्यता आहे. सिटी लिंक बससेवा सध्या पंचवटी आणि नाशिकरोड अशा दोन डेपोतून नाशिककरांना सेवा देते. या दोन्ही डेपोतील वाहक ठेकेदार एकाच कंपनीचे असल्याने आंदोलन झाल्यास संपूर्ण बससेवा ठप्प होते. त्यामुळे विद्यमान ठेकेदाराची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी आणखी एक ठेकेदार नियुक्ती करत दोन्ही डेपोंना स्वतंत्र ठेकेदारामार्फत वाहकांची नियुक्ती करणे हा मनपा प्रशासनाचा उद्देश होता.

    सिटीलिंकला राबवलेल्या निविदा प्रक्रियेत मुंबई व नागपूर येथील कंपनीने वाहक पुरवण्याची तयारी दर्शविली. त्यापैकी नागपूर येथील कंपनीने सर्व कागदपत्रे सादर केली. त्यामुळे या कंपनीशी वाहक ठेक्याबाबत बोलणी केली. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, त्यासाठी ठेकेदाराने एक कोटींची अनामत रक्कम बँकेत जमा करणे बंधनकारक आहे. पण त्यास संबधित कंपनीकडून टाळाटाळ सुरु आहे. ते पाहता जुन्या ठेकेदाराची मक्तेदारी मोडित काढण्याच्या मनपा प्रशासनाच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे.