पुण्यात 16 पंक्चर असल्याचे सांगत उकळले 1600 रुपये

    पुणे : पुण्यातील वाहनांचे पंक्चर दुकानदाराकडून लुटले जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले असून, याचा अनुभव एका लष्करातील जवानाला आला आहे. जवानाची गाडी पंक्चर झाल्यानंतर एकाची मदत घेतली. त्याने समोरीच पंक्चरचे दुकान दाखवले आणि तेथे गेल्यानंतर संगनमताने त्या दुकानदाराने 16 पंक्चर असल्याचे सांगत पैसे उकळले आहेत. त्याने दुचाकीच्या टायरचे नुकसान करून पैसे उकळले आहेत.
    संगनमताने फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
    याप्रकरणी आता लष्करात कार्यरत असलेल्या नरेश पाल (39, रा. विसावा कॉम्प्लेक्स, एअरफोर्स स्टेशन) यांनी दिलेल्या तक्रार दिली आहे. त्यानुसार अनोळखी आरोपींवर संगनमताने फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार 28 नोव्हेंबर रोजी घडला आहे.
    16 पंक्चर काढून त्यांच्याकडून 1600 रूपये उकळले
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेश पाल हे सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास विमाननगर येथून कमांड हॉस्पिटल येथे जात होते. रामवाडी जकातनाका ब्रिज जवळ जाताना त्याच्या मागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी तुमच्या दुचाकीत हवा कमी असल्याचे सांगत त्यांना समोरच असलेल्या पंक्चर दुकानात जाण्यास सांगितले. पंक्चर दुकानावरील दोन अनोळखी व्यक्ती व त्या गाडीत हवा कमी आहे सांगणार्‍या आरोपी यांनी संगनमत करून तब्बल 16 पंक्चर काढून त्यांच्याकडून 1600 रूपये उकळले. पुढील तपास येरवडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रविंद्र आळेकर करत आहे.
    प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांत तक्रार
    संशयीत आरेापींनी तक्रारदार यांना खोटे सांगून त्यांना पंक्चरच्या दुकानावर जाण्यास भाग पाडले. त्याच्या दुचाकीच्या तब्बल १६ पंक्चर काढल्या. दरम्यान, काही वेळानंतर त्यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार केली आहे.
    – रविंद्र आळेकर, सहायक पोलिस निरीक्षक, येरवडा पोलिस ठाणे.
    येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
    शहरात पंक्चरच्या नावाखाली हात चलाकी करून पैसे उकळणारे सक्रीय झाल्याचे या गुन्ह्यावरून समोर आले आहे. यापूर्वीही अशाच पध्दतीने पंक्चरच्या नावाखाली पैसे उकळल्याचा गुन्हा येरवडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांनीही अशा होणार्‍या फसवणूकीबाबत सतर्क राहीले पाहिजे.