Chief Minister Eknath Shinde

  मुंबई : राजस्थान निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी तापली असताना, इकडे महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंचा उल्लेख ‘हिंदुह्रदयसम्राट’ केल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राजस्थान विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २३ नोव्हेंबर रोजी राजस्थान दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी भाजपाचे उमेदवार बालमुकुंदाचार्य महाराज यांच्यासाठी प्रचारसभेत सहभाग घेतला.
  भाजपाकडून सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिले
  बालमुकुंदाचार्य महाराज यांच्या प्रचारासाठी स्थानिक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बॅनर्सही छापले होते. पण, या बॅनर्सवर छापण्यात आलेल्या मजकुरावरून सध्या वाद निर्माण झाल्याचे चित्र आहे. यासंदर्भात ठाकरे गटाने तीव्र आक्षेप घेतला असून, त्यावर आता भाजपाकडून सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
  नेमकं काय घडले?
  राजस्थानच्या हवामहल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने बालमुकुंदाचार्य यांना उमेदवारी दिली. त्यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या प्रचारसभेसाठी ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या बॅनर्सवर एकनाथ शिंदे यांचा उल्लेख ‘हिंदुह्रदयसम्राट’ असा करण्यात आला आहे. यावरून सध्या ठाकरे गट व सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली आहे. ठाकरे गटाने यासंदर्भात एक्सवर (ट्विटर) सविस्तर पोस्ट करून शिंदे गटाला लक्ष्य केलेआहे.
  जगात हिंदुह्रदयसम्राट फक्त एकच…
  “पक्ष चोरला, नाव चोरलं, बाप चोरायचा प्रयत्न केला. आता हेही? किती तो निर्लज्जपणा? जगात हिंदुह्रदयसम्राट फक्त एकच..वंदनीय बाळासाहेब ठाकरे. त्यांच्या आधी ना कुणी होता, त्यांच्यानंतर ना कुणी होऊ शकेल. जनता दूधखुळी नाही. सगळ्याचा हिशेब होणार”, अशी पोस्ट ठाकरे गटानं केली आहे.
  भाजपाचे स्पष्टीकरण
  दरम्यान, यावरून आरोप-प्रत्यारोप होत असताना भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी हातावर प्राण घेऊन बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या रक्षणासाठी इतकं मोठे पाऊल उचलले तर कार्यकर्त्यांना हिंदुत्वाचा आवाज म्हणजे एकनाथ शिंदे असं वाटणं साहजिक आहे. त्यामुळे उत्साहात त्यांनी तसे बॅनरवर लिहिले, तर त्याचा एवढा बाऊ करून एवढं राजकारण करणे गैर आहे”, असं मुनगंटीवार म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते.
  ‘त्या’ पत्रावरही केला खुलासा!
  एकीकडे भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठीच्या बॅनरवरून वाद चालू असताना दुसरीकडे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राचा मुद्दाही चर्चेत आला आहे. आंतरवली सराटीत झालेल्या पोलीस लाठीचार्जप्रकरणी पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्यावर दोषारोप असतानाही त्यांची बदली पुण्यात गुन्हे अन्वेषण विभागात करण्यात आली. गृहमंत्रालयाच्या या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी करणारं पत्र दीपक केसरकरांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं. यावर “एकानं मारल्यासारखं करायचं, दुसऱ्यानं लागल्यासारखं करायचं. सरकारमध्ये नेमकं चाललंय काय?” अशा शब्दांत काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतला. त्याबाबत विचारणा केली असता मुनगंटीवार यांनी त्यावर उत्तर दिलं.
  भाजपाच्या बॅनरवर एकनाथ शिंदेंचा ‘हिंदूहृदयसम्राट’ उल्लेख, भास्कर जाधव टीका करत म्हणाले…
  “एका मंत्र्यानं भाषा केली म्हणजे २९ मंत्र्यांमध्ये मतभेद आहेत असा का आभास होतो?” असा प्रश्न मुनगंटीवार यांनी उपस्थित केला आहे.