विधीमंडळाच्या लॉबीमध्ये राडा; शिंदे गटाच्या दोन बड्या नेत्यांमध्ये धक्काबुक्की

    मुंबई : सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यावेळी मात्र विधीमंडळाच्या लॉबीमध्ये तुफान राडा झाला आहे. सत्ताधारी शिंदे गटातील दोन आमदार एकमेकांना भिडले आहेत. एकाच पक्षातील दोन आमदारांमध्ये धक्काबुक्की झाल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. एका वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे आपापसांत भिडले आहेत.

    विधीमंडळाच्या लॉबीत शिंदे गटाच्या दोन आमदारांमध्ये राडा झाल्याचे प्रकार समोर आला आहे. शिंदे गटाचे आमदार दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांनी एकमेंकांना धक्काबुक्की केल्याची माहिती समोर आली आहे. विधीमंडळाच्या लॉबीमध्येच हा राडा झाला आहे. यानंतर शंभुराज देसाई आणि भरत गोगावले यांनी या भांडणामध्ये मध्यस्थी केल्याचे समोर आले आहे. यासंबधीचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे. हा वाद कशावरून झाला याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

    आगामी निवडणूकांआधी एकाच पक्षातील दोन नेत्यांमध्ये बाचाबाची होत असल्याने चर्चांना उधाण आले आहे. विधीमंडळाच्या लॉबीमध्ये हा प्रकार घडल्यामुळे विरोधकांनी शिंदे गटाला धारेवर धरले आहे. या प्रकाराबाबत शिंदे गटाच्या इतर नेत्यांकडून सावरासावरी केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील माध्यमांशी याबाबत प्रश्न केले असता यांनीही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र दादा भूसे व महेंद्र थोरवे यांच्यामध्ये झालेल्या धक्काबुक्कीचे खरे कारण अद्याप समोर आलेले नाही.