वानवडीत दोन गटात हाणामारी, तडीपार गुन्हेगाराचा खून; दोघे गंभीर

मंगला टॉकीज परिसरात दोन गटातील वर्चस्व वादातून सराईत गुन्हेगारीची हत्या ताजी असतानाच वानवडी येथील सय्यदनगर परिसरात दोन गटात झालेल्या वादातून तुंबळ हाणामारी झाली. या मारहाणीत तडीपार गुन्हेगाराचा खून तर, दोघेजन गंभीररित्या जखमी झाले आहेत.

    पुणे : मंगला टॉकीज परिसरात दोन गटातील वर्चस्व वादातून सराईत गुन्हेगारीची हत्या ताजी असतानाच वानवडी येथील सय्यदनगर परिसरात दोन गटात झालेल्या वादातून तुंबळ हाणामारी झाली. या मारहाणीत तडीपार गुन्हेगाराचा खून तर, दोघेजन गंभीररित्या जखमी झाले आहेत. दरम्यान, भरवर्दळीच्या वेळीच हा प्रकार घडल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या मारहाणीचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.

    आजीम वजीर शेख उर्फ अंत्या (वय २४) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर, अल्ताफ वजीर शेख, रेहान रियाज खान, शकील इजहार अन्सारी व शाहरूख सलीम शेख आणि वजीर अली मेहबुबअली शेख हे जखमी झाले असून, त्यातील दोघे गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आजीम शेख उर्फ अंत्या याला वानवडी पोलिसांनी शहर परिसरातून तडीपार केलेले होते. तरी देखील तो पुण्यातील वानवडी सय्यदनगरमध्ये आलेला होता. गल्ली नंबर १९ व २१ वादावादी आहे. दरम्यान, १६ ऑगस्ट रोजी या दोन गटात रात्री वाद झाले होते. ते वाद मिटविण्यासाठी म्हणून तक्रारदार तसेच आजीम शेख याला बोलवले गेले होते. त्यावेळी दोन्ही गट समोरासमोर आले.

    वादावादीबाबात बोलणे सुरू असतानाच अचानक १० जणांच्या टोळक्याने धारधार हत्याराने सपासप वार करण्यास सुरूवात केली. टोळक्याने आजीम शेख याच्यावर हल्ला केला. या हल्यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. तर, त्यांच्यासोबत असलेल्या दोघांवर देखील हल्ला करण्यात आला. दोघे गंभीररित्या जखमी झाले.

    तर, इतरांना देखील मारहाण करून परिसरात दहशत माजवत त्यांनी गोंधळ घातला. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलीस व गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी रवाना झाले. दरम्यान, याघटनेने परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.