
कधी कर्मचाऱ्यांच्या तर कधी चालकांच्या वेगवेगळ्या कारणावरून टोल नाका नेहमी चर्चेत राहत असतो. नुकतेच 'गाडी मागे घ्या, चेक करून सोडतो' याचा राग आल्याने एका वाहनचालकाने पिंपळगाव टोलनाक्यावर (Pimpalgaon Toll Plaza) असलेल्या एका कर्मचाऱ्याला शिवीगाळ व दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
पिंपळगाव : कधी कर्मचाऱ्यांच्या तर कधी चालकांच्या वेगवेगळ्या कारणावरून टोल नाका नेहमी चर्चेत राहत असतो. नुकतेच ‘गाडी मागे घ्या, चेक करून सोडतो’ याचा राग आल्याने एका वाहनचालकाने पिंपळगाव टोलनाक्यावर (Pimpalgaon Toll Plaza) असलेल्या एका कर्मचाऱ्याला शिवीगाळ व दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिवाय गाडीच्या बोनेटवर डोके आदळून हातात असलेल्या लोखंडी कड्याने मारहाण केली.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टोल नाका कर्मचारी कृष्णा राजाराम चौधरी हा पिंपळगाव टोल नाका लेन नं. १५ वर ड्युटीस असताना दशरथ रामदास पुरकर यांनी त्यांच्या ताब्यातील कार पिंपळगाव टोल नाक्यावर लेन नं. १७ मध्ये उभी केली. त्यावेळी फिर्यादी कृष्णा चौधरी व साक्षीदार यांनी गाडी चालकास सदरची गाडी लूपवर आहे. गाडी मागे घ्या, चेक करून गाडी सोडतो, असे सांगितले. याचा चालक दशरथ रामदास पुरकर व त्यासोबत असलेले जितेंद्र दशरथ पुरकर, रवींद्र दशरथ पुरकर आणि कृष्णा रघुनाथ जाधव (सर्व रा. सुभाषनगर, देवळा तालुका) यांना राग आला. त्यांनी गाडीतून उतरून फिर्यादीस शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
कृष्णा चौधरी हे गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना तातडीने पिंपळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. या संदर्भात चार संशयित आरोपींविरोधात पिंपळगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलिस निरीक्षक अशोकराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार जाधव पुढील तपास करत आहेत.