पुलाची शिरोली येथे मध्यरात्री राडा; तरुणांच्या दोन गटात हाणामारी, तब्बल 28 जणांविरोधात गुन्हा दाखल

पुलाची शिरोली (Pulachi Shiroli) येथील यात्रेनिमित्त सुरू असणारा सांस्कृतिक कार्यक्रम संपल्यानंतर मध्यरात्री तरुणांच्या दोन गटात मारामारी (Clashes in Shiroli) झाली. लाकडी फळी, फरशी, लोखंडी गज व काठ्यांचा वापर करण्यात आला. यामध्ये तिघे जखमी असून, वाहनांची नासधूस करण्यात आली आहे. घरावरही दगडफेक झाली आहे.

    शिरोली : पुलाची शिरोली (Pulachi Shiroli) येथील यात्रेनिमित्त सुरू असणारा सांस्कृतिक कार्यक्रम संपल्यानंतर मध्यरात्री तरुणांच्या दोन गटात मारामारी (Clashes in Shiroli) झाली. लाकडी फळी, फरशी, लोखंडी गज व काठ्यांचा वापर करण्यात आला. यामध्ये तिघे जखमी असून, वाहनांची नासधूस करण्यात आली आहे. घरावरही दगडफेक झाली आहे.

    आतिश उर्फ अभिजीत विलास चौगुले, अभिजीत अरविंद कौंदाडे व चंद्रकांत उर्फ बंडू शामराव जाधव (सर्व रा. माळवाडी, पुलाची शिरोली) अशी जखमींची नावे आहेत. परस्परविरोधी फिर्यादीवरून 28 जणांविरुद्ध शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत मिळालेली माहिती अशी, पुलाची शिरोली येथील ऊरुस व यात्रा सुरू आहे. यानिमित्त विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम सुरू आहेत. रविवारी रात्री सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होता. हा कार्यक्रम सोमवारी पहाटे संपला. कार्यक्रम संपल्यानंतर घरी जात असताना अभिजीत चौगुले याला काही मित्रांकडून अभिजीत कौंदाडे याला मारहाण केल्याचे समजले. म्हणून त्याने अभिजीत कौंदाडेच्या दिशेने धाव घेतली. त्यामुळे त्याला व त्याच्यासोबत असणारा चंद्रकांत जाधव याला लाथाबुक्क्यांनी, लाकडी फळीने व फरशीच्या तुकड्याने मारहाण करण्यात आली. यामध्ये तिघेही जखमी झाले. जखमींना उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले.

    दरम्यानच्या काळात एक मोठा जमाव सातपुते यांच्या घरावर हल्ला करण्यासाठी गेला. सातपुते यांच्या दारात असणारी महिंद्रा कंपनीची झायलो जीप, टाटाची मालवाहतूक इंट्रा व एक मोपेड यांची नासधूस करून घराच्या दरवाजावर लाथा बुक्क्या मारत रोहित सातपुते कुठे आहे? त्याला आम्ही सोडत नाही, असं म्हणत कंपाउंडची भिंतही पाडली. त्यानंतर सातपुते यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. राहुल शहाजी सातपुते (वय 29) यांच्या फिर्यादीवरून 28 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.