संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

जिल्ह्यातील पुसेसावळीमध्ये सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आक्षेपार्ह पोस्टवरून दोन समाजामध्ये तेढ (Clashes in Pusesawali) निर्माण झाली. या प्रकरणामुळे एका गटाने दुसऱ्या गटाच्या धार्मिक स्थळावर हल्ला केला.

  सातारा : जिल्ह्यातील पुसेसावळीमध्ये सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आक्षेपार्ह पोस्टवरून दोन समाजामध्ये तेढ (Clashes in Pusesawali) निर्माण झाली. या प्रकरणामुळे एका गटाने दुसऱ्या गटाच्या धार्मिक स्थळावर हल्ला केला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला. त्यानंतर या प्रकरणावरून जाळपोळ होत पुसेसावळीत तणाव निर्माण झाला.

  या हल्ल्यात एका युवकाचा मृत्यू झाल्याने हे प्रकरण प्रचंड तापले. संबंधित प्रकरणातील आरोपींना पोलिस अटक करत नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका एका गटाने घेतली. पोलिसांच्या आश्वासनानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. या प्रकरणी आता २३ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, साताऱ्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

  मुख्य सूत्रधार कोण ?

  पुसेसावळीतील घटनेमुळे आणखी काही अनर्थ घडू नये यासाठी सातारा पोलिसांनी आता संचारबंदी लागू केली आहे. तरीही या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला ताब्यात घेण्यासाठी पुसेसावळीत शांततेत मोर्चा काढला. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार नेमका कोण आहे, असा सवाल करत या हल्ल्यातील मुख्य सूत्रधाराला पोलिसांनी ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.

  दुर्लक्ष केल्याचा पोलिसांवर आरोप

  पुसेसावळीत पंधरा दिवसांपूर्वी आक्षेपार्ह पोस्टवरून वाद झाला होता. त्याचवेळी पुसेसावळीतील काही नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती. त्या पोस्टची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली होती. पोलिसांना या घटनेची माहिती देऊनही त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळेच ही घटना घडल्याचे पुसेसावळीतील नागरिकांचे म्हणणे आहे.