समस्यामुक्त करा अन्यथा कर्नाटकामध्ये जाणार; कन्नड साहित्य परिषदेत इशारा

विनाकारण सीमावर्ती भागातील कन्नड भाषिक दुखावला जात असून या भागातील जनतेला सन्मान न दिल्यास, विकास न केल्यास आम्ही ठराव करून कर्नाटकामध्ये जाण्याची तयारी दाखवू, असा इशारा कन्नड साहित्य परिषद महाराष्ट्र घटकाचे अध्यक्ष सोमशेखर जमशेट्टी यांनी दिला आहे.

    सोलापूर – महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद (Maharashtra- Karnataka Border) हा अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. प्रत्येकवेळी अनेक राजकीय पक्षांनी आपल्या स्वार्थासाठी हा विषय प्रलंबित ठेवून राजकारण तापवत ठेवल्याचे दिसून येते. कित्येक वेळी हा मुद्दा उपस्थित करून सीमाप्रश्नाचे राजकारण (Politics) केले जात आहे. यामध्ये विनाकारण सीमावर्ती भागातील कन्नड (Kannada) भाषिक दुखावला जात असून या भागातील जनतेला सन्मान न दिल्यास, विकास न केल्यास आम्ही ठराव करून कर्नाटकामध्ये जाण्याची तयारी दाखवू, असा इशारा कन्नड साहित्य परिषद (Kannada Sahitya Parishad) महाराष्ट्र घटकाचे अध्यक्ष सोमशेखर जमशेट्टी (Somshekhar Jamshetti) यांनी दिला आहे.

    या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाची सुनावणी होईल, या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागात हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. परंतु, सोलापूर हा बहुभाषिकांचे शहर आहे. जिल्ह्यात कन्नड भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असूनही भाषामध्ये भेदभाव केला जात नाही. त्यात कन्नड-मराठी भाषिक कधीच भांडत नाही. सोलापूर जिल्ह्याचा विकास आणि तरुणांसाठी दर्जेदार शिक्षण आणि रोजगार हे आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. या भागातील कन्नड भाषिकांवर अन्याय होत असेल तर संघर्ष हाच आमचा मार्ग आहे.

    अनेक वर्षांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारकडून आमच्यावर अन्याय होत आहे. सीमा भागातील तरुणांना नोकऱ्या नसल्याने लोक नोकऱ्यांच्या शोधात महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि कर्नाटकातील बेंगळुरूसारख्या शहरांमध्ये स्थलांतरित होत आहेत. दोन्ही सरकारांनी आमच्याकडे दुर्लक्ष केले. सीमेचा प्रश्न आला की ते आपल्याला आठवतात. बसवराज बोम्मई यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रात कन्नड माध्यमाच्या शाळा आणि कन्नड भवन बांधण्यासह अनुदान देत आहेत.

    महत्त्वाचे म्हणजे दोन्ही राज्य सरकारने आम्हाला विकास, शिक्षण आणि रोजगारात विशेष आरक्षण दिले पाहिजे. उजनीतून हिळ्ळीपर्यंत तीन पीएमसी पाणी सोडावे, आपल्या जिल्ह्यातील जनतेने विकास, शिक्षण, रोजगार यामध्ये सातत्याने अन्याय सहन केला आहे. दोन्ही राज्य सरकारांनी आमची समस्या समजून घेऊन त्यावर उपाययोजना कराव्यात, असे मागणी सोमशेखर जमशेट्टी यांनी केली.