पुण्यातील हुशार चोरटे; चोरलेला आयफोन परत दिला अन्…

  पुणे : पुण्यातील चोरटे हुशारच असल्याचे वेळोवेळी पुणे पोलिसांना अन् पुणेकरांना दाखवून दिले आहे. पुन्हा एकदा या चोरट्यांनी आपली हुशारी दाखवली असून, लुटमारीत दोघांचे मोबाईल जबरदस्तीने काढून घेतले, पण त्यात एक आयफोन दिसताच चोरट्यांनी “नको आयफोन पोलिसांना ट्रेस होतो” म्हणत पुन्हा तो परत देऊन दुचाकीवरून पोबारा केल्याची घटना घडली. दिवेघाटात हा प्रकार घडला असून, याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद केला आहे.

  दोन दुचाकीवरील तीन अज्ञातांविरोधात गुन्हा

  याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अभिषेक मनोज गुप्ता (वय १९) या तरुणाने तक्रार दिली आहे. त्यावरून दोन दुचाकीवरील तीन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २० एप्रिल रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली आहे.

  चोरट्यांची हुशारी अन् तक्रारदार अवाक्

  पोलिसांच्या माहितीनुसार, अभिषेक आणि त्यांचा मित्र अशोक चौधरी हे दुचाकीने खंडोबाच्या दर्शनासाठी निघाले होते. दिवेघाटातील पहिल्या वळणावर आले असता समोरून दोन दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांना अडविले. त्यांना खाली उतरवत त्यांच्या खिशातील मोबाईल काढले. दोन्ही मोबाईल घेतल्यानंतर मात्र त्यात त्यांना एक आयफोन दिसला. आयफोन पाहताच एका चोरट्याने “नको हा आयफोन पोलिसांना ट्रेस होतो,” म्हणत अशोकला परत दिला आणि अभिषेकचा एक मोबाईल घेऊन पोबारा केला. चोरट्यांची ही हुशारी पाहून तक्रारदार तरुण देखील आवाक झाला. दरम्यान, याप्रकरणात अभिषेकचा २२ हजारांचा मोबाईल चोरीस गेला आहे.

  अर्ध्या तासाने आणखी एका तरुणाला लुटले

  हुशार चोरट्यांच्या याघटनेनंतर अर्ध्या तासाने आणखी दोन तरुणांना दोन दुचाकीवरील तीन चोरट्यांनी लुटल्याची घटना घडली आहे. ही घटना देखील दिवेघाटाच्या पहिल्याच वळणावर लुटली असून, चोरट्यांनी १३ हजारांचा मोबाईल घेऊन पोबारा केला आहे.

  स्मार्ट चोरट्यांचा फोन पे, गुगल पेद्वारे पैसे ट्रान्सफर…

  शहरात लुटमारीच्या घटना गेल्या काही वर्षात वाढल्या आहेत. यापुर्वी हुशार चोरट्यांकडून लुटमार करताना कोणाकडे पैसे न मिळाल्यास त्यांचे मोबाईल काढून त्यातील फोन पे व गुगल पेद्वारे पैसे ट्रान्सफरकरून घेत असत. चोरटे हुशार होते, पण नंतर पोलिसांनी यावरूनच चोरट्यांचा माग काढत त्यांना बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर लुटमारीत ऑनलाईन चोरीच्या अशा घटना थांबल्या.