औरंगाबामध्ये ढगफुटी सदृश पाऊस; शेतीचे मोठे नुकसान

    औरंगाबाद : औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात रविवारी पासून अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. कन्नड तालुक्यातील पिशोर परिसरात ढगफुटी सदृश पाऊस पडला असुन तेथील नदी नाल्यांना पूर आला आहे. या पुरामुळे सात गावांचा संपर्क तुटला असून, गावकऱ्यांची दळणवळण व्यवस्था बंद पडली आहे. सोबतच पिशोर येथील अंजना पळशी प्रकल्प देखील ओव्हर फ्लो झाल्याची माहिती मिळाली आहे.

    रात्रीच्या सुमारास कन्नड तालुक्यातील पिशोर भागात ढगफुटी सदृश पाऊस झाला. त्यामुळे परिसरातील कोळंबी तांडा-भारंबा, भारंबा वाडी, माळेगाव ठोकळ, माळेगाव लोखंडी, जैतखेडा, साळेगाव यासह अनेक गावचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे शेतात गुरांना चारा पाणी करण्यासाठी आणि दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून पाण्यातून प्रवास करावा लागत आहे.

    पिशोर भागात झालेल्या ढगफुटी सदृश पाऊसामुळे अनेक भागातील शेतात पाणी तुंबले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना पूर ओसरल्यावर मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागणार असून रविवारी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.