ढगाळ वातावरणाने शेतकरी चिंतेत; ‘या’ पिकांवर रोगराईची शक्यता

वातावरणात बदल होत असल्यामुळे पिकांवर रोग पडण्याचे प्रमाण वाढत आहे. सततचे ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाने हवेत आर्द्रतेचे प्रमाण जास्त आहे. याचा कांद्यासह ऊस, मका, हरभरा आणि गहू पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे.

  बदलत्या वातावरणामुळे शेतकरी हैराण झाला आहे. अगदी हिवाळ्यात सुद्धा पावसाचे वातावरण तयार होताना दिसत आहे. कधी अचानक गारठा वाढत आहे तर दाट धुके पडत आहे. वातावरणात बदल होत असल्यामुळे पिकांवर रोग पडण्याचे प्रमाण वाढत आहे. सततचे ढगाळ वातावरण व अवकाळी पावसाने हवेत आर्द्रतेचे प्रमाण जास्त आहे. याचा कांद्यासह ऊस, मका, हरभरा आणि गहू पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे.

  ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडीचे आणि रोगराईचे प्रमाण वाढताना दिसत आहे. मका पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्याला वारंवार औषध फवारणी करावी लागत आहे. ढगाळ वातावरणामुळे गहू पिकावर तांबेरा पडला आहे, हरभरा पिकांवर अळी व ऊस पिकांवरती लोकरी मावा, कांदा पिकांवर रसशोषित किडीचा प्रादुर्भाव झाल्याने पांढरे ठिपके पडले आहेत.

  यंदा कांदा लागवडी करणाऱ्या मजूर महिलानी देखील मजुरीचे दर वाढवले आहेत. आता वारंवार फवारणी करावी लागत असल्याने उत्पादन खर्च वाढला आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहे. शेतकरी सगळीकडूनच अडचणीत आला आहे. दुधाला भाव नसल्यामुळे आधीच निराशा आहे. यात आणखी भर म्हणजे वातावरण बदलासारखे नैसर्गिक संकट. बदलत्या वातावरणामुळे नागरिकांचे आजारी पडण्याचे प्रमाणही वाढले आहे. सर्वच अडचणी पाहता शेतकरी निराश होत आहे. यावर सरकारने लवकरात लवकर पिक अनुदान द्यावे, अशी मागणी होत आहे.

  काय उपाय याेजावेत ?

  हरभऱ्यावर ५ टक्के निंबोळी अर्काची पहिली फवारणी करावी. कांद्यावर फूलकिडे आढळल्यास डायमेथोएट ३० टक्के ईसी १५ मिली प्रति दहा लिटर पाण्यातून फवारावे. गव्हावर राेगाचा प्रादुर्भाव झाल्यास मॅटारायझेम अॅनीसोप्लीची फवारणी करावी, असा सल्ला दिला जात आहे.

  कांदा पातीवर पांढरे ठिपके

  ढगाळ वातावरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी अधिक चिंतेत आहे. या वातावरणामुळे कांदा पिकाच्या पाती पिवळ्या पडून वाकत असल्याचे दिसून येत आहे. किडीमुळे पातीवर पांढरे ठिपके पडल्याचेही दिसत आहे. एका बाजूला निर्यातबंदीचा फटका आणि त्याच वेळी बदलते हवामान यामुळे शेतकरी धास्तावला आहे.