cm eknath shinde

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सिंधुदुर्गच्या सावंतवाडी आणि कुडाळ मध्ये दोन ठिकाणी विविध योजनेचा शुभारंभ तसेच उद्घाटनांचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला.

    सिंधुदुर्ग: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे तसंच नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाप्रमाणे मुंबई-सिंधुदुर्ग महामार्ग तयार केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली आहे. शासन आपल्या दारी (Shasan Aapalya Dari) या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सिंधुदुर्गात आहेत. या कार्यक्रमाअंतर्गत बोलताना मुख्यमंत्र्यांनी कोकणासाठी काही योजना जाहीर केल्या.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सिंधुदुर्गच्या सावंतवाडी आणि कुडाळ मध्ये दोन ठिकाणी विविध योजनेचा शुभारंभ तसेच उद्घाटनांचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. तसंच ‘शासन आपल्या दारी’ या योजनेतून विविध लाभार्थ्यांना आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. त्यासाठी लाभार्थ्यांची मोठी गर्दी कुडाळ हायस्कूलच्या पटांगणावर झाली होती.

    मुंबई-सिंधुदुर्ग रस्ता
    यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, “मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे, नागपूर-मुंबई महामार्ग जसा केला तसाच प्रकारचा मुंबई-सिंधुदुर्ग रस्ता एमएसआरडीसीच्या माध्यमातून तयार करत आहोत. एमएमआरडीएच्या धर्तीवर कोकण प्राधिकरण तयार केलं जाईल. यामुळे कोकणाच्या विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळल्याशिवाय राहणार नाही. समृद्ध कोकण घडवण्यासाठी आपण प्रयत्न करु.”

    ते पुढे म्हणाले की, “आता शासकीय कामांसाठी सतत शासनाच्या दारी खेटे मारावे लागणार नाहीत. कारण सरकार तुमचं आहे. अनेक दाखले एकाच छताखाली देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आठ ते नऊ महिन्यात सर्वाधिक एफडीआय महाराष्ट्राने आणला.”

    जगात आपली अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर पोहोचली आहे. केंद्र सरकारचं देखील आम्हाला पाठबळ आहे. सहकार क्षेत्र अडचणीत असल्याचं सांगितल्यानंतर दहा हजार कोटींचा इन्कम टॅक्स माफ करण्यात आला. हे डबल इंजिनचं सरकार आहे. मागील आठ ते नऊ महिन्यात सर्वाधिक एफडीआय महाराष्ट्राने आणला आहे. आपण कर्नाटक आणि गुजरातला देखील यात मागे टाकल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

    हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. कोकणाला निसर्गाचा वरदहस्त आहे. सावंतवाडीला आर्थिक चालनाला देण्यासाठी शॉपिंग सेंटर उभारलं जातं आहे. व्यापारी, कारागीरासोबतच आचरेकर यांच्या नावाचं ड्रेस रुम बांधण्यात येत आहे ही सुखद बाब आहे. बांद्याला क्रीडा संकुल उभारलं जाणार आहे. चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचं नाव देण्याचा निर्णय घेतलेला आहे,असं ते म्हणाले.

    नोकरी देणारे हात तयार करणार
    बाळासाहेब नेहमी म्हणायचे नोकरी देणारे हात तयार करा आणि नारायण राणे साहेबांच्या माध्यमातून आपण ते करु शकतो. राणे साहेबांना मनापासून धन्यवाद देईन. एमएसएमईच्या माध्यमातून मोठा निधी केंद्राकडून मिळत आहे. राज्य आणि केंद्राच्या माध्यमातून कामं केलं जातील, असं एकनाथ शिंदे म्हणाले.