मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांसाठी पंतप्रधान मैदानात; कल्याणमध्ये एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशिर्वादामुळे श्रीकांत शिंदे नक्की निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

    कल्याण : लोकसभा निवडणूकीचे चार टप्पे पार पडल्यानंतर महायुती पाचव्या टप्प्यातील जोरदार प्रचार करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये प्रचाराचा जोर वाढवला असून आज पुन्हा एकदा नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. कल्याणमधील उमेदवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी स्वतः पंतप्रधान कल्याणमध्ये प्रचार सभा घेत आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशिर्वादामुळे श्रीकांत शिंदे नक्की निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

    ते जनतेच्या ह्रदयातील पंतप्रधान

    कल्याणमधील सभेमध्ये बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अग्निपथमधील डायलॉग म्हणत सुरुवात केली. भाषणामध्ये बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मी आज पर्यंत नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर थकवा पाहिलेला नाही. ते जनतेच्या ह्रदयातील पंतप्रधान आहेत. 2014 नंतर मोदी हे तीन वेळा कल्याणमध्ये आले आहेत हे आपलं भाग्य आहे. मोदींच्या आशिर्वादामुळे कपिल पाटील आणि डॉ. श्रीकांत शिंदे हे विजयाची हॅट्रीक करणार आहेत. असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

    एकटे मोदी या सर्वांना भारी पडत आहे

    पुढे ते म्हणाले “ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी असणारी आहे. राष्ट्राचं भवितव्य घडवणारी आणि विकास घडवणारी आहे. देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारी ही निवडणूक आहे. देशात सर्वत्र मोदींचा गजर ऐकू येत आहे. पण भरकटलेला विरोधीपक्ष मोदींच्या नावाने शिव्याशाप देत आहे. त्यांना टार्गेट करत आहेत. पण देश पाहतोय की एकटे मोदी या सर्व विरोधकांना भारी पडत आहे. प्राण जाए पर वचन न जाए ही मोदीजींची ओळख आहे. नरेंद्र मोदी हे भाषणामध्ये देशाचं उज्ज्वल भविष्य आणि त्यांचं व्हिजन सांगतात. विरोधक मात्र टीका टिप्पणी करत बसतात,” असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याणमधील भाषणामध्ये लगावला.