राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र मागे राहणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र (Maharashtra) कुठेही मागे राहणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (CM Eknath Shinde) यांनी राजभवन (Rajbhavan) येथे केले.

    मुंबई:कुलगुरू केवळ विद्यापींठाचे प्रमुख असतात असे नाही तर त्या विद्यापीठाच्या क्षेत्रात, परिसरात शिक्षणाचा झेंडा रोवणारा कर्णधार असतो. नवीन पिढी घडविण्यात कुलगुरूंची फार मोठी जबाबदारी असते. विद्यापीठात होणारे संशोधन, शैक्षणिक उपक्रम, नावीन्यपूर्ण शिक्षण यावर शिक्षणाचा दर्जा अवलंबून असतो. म्हणून कुलगुरू विद्यार्थ्यांचे खऱ्या अर्थाने पालक असतात, असे सांगून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र (Maharashtra) कुठेही मागे राहणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (CM Eknath Shinde) यांनी राजभवन (Rajbhavan) येथे केले.

    राजभवन येथे राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या संयुक्त मंडळाची बैठक (Vice Chancellor Meeting) राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर सर्व विद्यापींठाचे कुलगुरू उपस्थित होते.

    उद्योग, गुंतवणूक, पायाभूत सुविधा याबरोबरच शिक्षणासारख्या महत्वाच्या क्षेत्रात देखील महत्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत. कुलगुरु, प्र-कुलगुरु यांची निवड पद्धती आता विद्यापीठ अनुदान आयोगाने विहित केल्याप्रमाणे करण्याचा निर्णय घेतला. यानुसार महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ च्या विविध कलमांमध्ये सुधारणा करण्यात येत आहेत. निवड प्रक्रियेला गती देण्यात येईल.

    नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची उत्कृष्ट अंमलबजावणी कशी करता येईल. याकडे विशेष लक्ष द्यावे. गुणवत्तापूर्ण, सहज, सुलभ आणि समान शिक्षण उपलब्ध होणे महत्वाचे आहे. नवीन शैक्षणिक धोरण हे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. यासाठी सर्वांचे मार्गदर्शन आणि साथ महत्वाची आहे.

    वर्षाला २५ हजार तरुण उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे.शिक्षण फक्त हुशार करणारे नसावे तर सध्याच्या परिस्थितीत ठामपणे पाय रोवून उभं राहण्याची जिद्द निर्माण करणारे देखील असावे. असेही. शिंदे यांनी यावेळी सांगितले. विद्यापीठाने शैक्षणिक गुणवत्ता आणि सुलभता याकडे विशेष लक्ष द्यावे, असे ते म्हणाले.