बारा बलुतेदारांसाठी श्री संत गाडगेबाबा आर्थिक मागास विकास महामंडळ स्थापन करणार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

बारा बलुतेदारांसाठी श्री संत गाडगेबाबा आर्थिक मागास विकास महामंडळ स्थापन केले जाईल, असे सांगतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू न देता मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल, अशी ग्वाही सोमवारी दिली.

    मुंबई : बारा बलुतेदारांसाठी श्री संत गाडगेबाबा आर्थिक मागास विकास महामंडळ स्थापन केले जाईल, असे सांगतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू न देता मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल, अशी ग्वाही सोमवारी दिली.

    प्रतापगड येथे शूरवीर जिवाजी महाले स्मारकासाठी जागा दिली जाईल, बारा बलुतेदार समाजासाठी विश्वकर्मा कौशल्य प्रशिक्षण योजना म्हणून कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून स्वतंत्र व्यवस्था केली जाईल. तेर-ढोकी येथील संत गोरोबा काका समाधीस्थळास ‘अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा दिला जाईल. ऋणमोचन येथील संत गाडगेबाबा कर्मभूमी स्मारकाच्या तसेच पंढरपुरातील नामदेव महाराज समाधीस्थळ विकासासाठी गती दिली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

    कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही

    राज्यातील बारा बलुतेदार समाज संघटनांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री शिंदे यांची सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे भेट घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. कोविड काळात लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद राहिल्याने आर्थिक विवंचनेतून नाभिक समाजातील काही व्यक्तींनी आत्महत्या केली होती, अशांच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले.