“गरिबी हटावचा नारा देत काँग्रेसनं गरिबांनाच हटवलं” नांदेडच्या भाषणामध्ये एकनाथ शिंदेंचे टीकास्त्र

एकनाथ शिंदे यांनी हिंदीमधून भाषणाची सुरुवात करत नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

    नांदेड – लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्र दौरे वाढले आहेत. आज नरेंद्र मोदी यांची नांदेडमध्ये प्रचार सभा झाली. सकाळी झालेल्या या सभेमध्ये नरेंद्र मोदी यांनी मराठीतून तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदीमधून भाषणाला सुरुवात केली. त्यामुळे ही सभा चर्चेचे कारण ठरली आहे. एकनाथ शिंदे यांनी हिंदीमधून भाषणाची सुरुवात करत नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

    गरिबी हटावचा नारा देत काँग्रेसने गरिबांना हटवले

    भाषणामध्ये एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदींचे कौतुक करत राहुल गांधींवर निशाणा साधला. एकनाथ शिंदे म्हणाले, विश्वासाच दुसरे नाव नरेंद्र मोदी आहे. त्यांनी देशातील 32 करोड लोकांना गरिबी रेषेच्या वर काढले आहे. काँग्रेसने गरिबी हटावचा नारा देत गरिबांना हटवले. ही नांदेड आणि हिंगोलीची निवडणूक नाही. तर देशाची निवडणूक आहे. ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आहे. मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्याची गँरटी महाराष्ट्राची आहे. असे विश्वास एकनाथ शिंदे यांनी भाषणामध्ये व्यक्त केला.

    विरोधकांना उमेदवार मिळत नाहीत

    लोकसभेच्या निवडणूकीतील पहिल्या टप्प्यातील मतदान देखील पार पडले आहे. कॉंग्रेसच्या नेत्यांनी आधीच पराभव मान्य केला असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. मोदी पुढे म्हणाले, निवडणुकीच्या अगोदरच काँग्रेसच्या नेत्यांनी पराभव पत्कारला आहे. या निवडणुकीत विरोधकांना उमेदवार मिळत नाहीत. २५ टक्के जागांवर इंडिया आघाडीचे उमदेवार आपआपसात निवडणूक लढवणार आहे. त्यांच्यावर विश्वास कसा ठेवणार? ही लोक एकत्र लढवून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. काँग्रेसच्या ७० वर्षांच्या कामानंतर मोदी सरकारने केलेली विकास कामे जनतेसमोर आहेत. काँग्रेसने दिलेल्या प्रत्येक जखमेवर उपचार करणे, ही नरेंद्र मोदी यांची गॅरंटी आहे. मराठवाड्याचा विकास करणे ही मोदी यांची गॅरंटी आहे, असे नरेंद्र मोदी हे भाषणात म्हणाले.