“बाप एक नंबरी बेटा दस नंबरी”; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

वसमतमध्ये महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री शिंदे यांनी सभा घेतली. यामध्ये त्यांनी ठाकरे कुटुंबावर जोरदार निशाणा साधला.

    हिंगोली – राज्यामध्ये लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रचार सभा सुरु आहेत. पक्षश्रेष्ठींच्या वाऱ्या देखील राज्यामध्ये वाढल्या असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी देखील वाढल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील विरोधकांवर टीकेची झोड उठवली आहे. हिंगोली येथील वसमतमध्ये महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री शिंदे यांनी सभा घेतली. यामध्ये त्यांनी ठाकरे कुटुंबावर जोरदार निशाणा साधला.

    मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?

    “देशात गेल्या ५० वर्षांपासून गरीबी हटावचा नारा देणाऱ्या पक्षाने नारा दिला. पण गरीबी हटली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने २५ कोटी जनतेला गरीबीतून वर आणले आहे. गेल्या ५० ते ६० वर्षात जे काम झाले नाही ते गेल्या १० वर्षात झाले आहे. आज १० वर्षात केलेला कारभार आणि ५० वर्षात त्यांनी (काँग्रेसने) केलेला कारभार पाहा. जर याची तुलना केली तर १० वर्षांची उंची ही एका हिमालयाएवढी वर जाईल आणि ५० वर्षांची एवढी छोटी टेकडी दिसेल”, असा हल्लाबोल मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर केला.

    सरकार फेसबुकवर चालत नाही

    पुढे ते म्हणाले,“आम्ही दोन वर्षांपूर्वी उठाव केला आणि लोकांना न्याय देणारे सरकार स्थापन केले. घरात बसून सरकार चालवता येत नाही. अजित पवार सकाळी ६ वाजता उठतात. मी पहाटेपर्यंत काम करतो. पहाटे अजित पवार काम सुरु करतात आणि देवेंद्र फडणवीस दिवसभर काम करतात, म्हणजे २४ तास आपले सरकार चालते आहे. घरी बसून राज्य चालवता येत नाही. फेसबुक लाईव्ह वरुन राज्य चालवता येत नाही”, असा हल्लाबोल मुख्यमंत्री शिंदे यांनी केला