cm eknath shinde

  Eknath Shinde : उद्धव ठाकरे यांनी जळगावमधील सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधत मोठे टीकास्त्र सोडले होते. आज याला प्रतित्त्युत्तर देताना जळगाव येथे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबोधित करताना उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. गेल्या वर्षभरात आम्ही अनेक निर्णय घेतले. देशाला पुढे न्यायचे असेल तर नरेंद्र मोदी यांच्याशिवाय देशाला पर्याय नाही. राज्याला नरेंद्र मोदी यांचा नेहमी पाठिंबा राहतो. राज्यातील सरकार गतीमान झाले आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
  आम्ही थांबलेले सरकार सुरू केले
  अडीच वर्ष सरकार थांबले होते. मात्र, आम्ही थांबलेले सरकार सुरू केले आहे. अनेक योजना सुरू केल्या. शेतकऱ्याचा मुलगा असल्याचा मला अभिमान आहे. मी भीमाशंकर, शिर्डीला गेलो तर काही लोकांनी  माझ्यावर टीका केली. मात्र मी शेतकऱ्यांवरील संकटं टळू दे, अशी मागणी केली, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
  टीका करणाऱ्यांचा देखील उपचार करणार
  शासन आपल्या दारी येते म्हणून अनेक लोकांचे पोट दुखत आहे. त्यामुळे लवकर आम्ही डॉक्टर आपल्या दारी हा कार्यक्रम सुरु करणार आहोत. म्हणजे टीका करणाऱ्यांचा देखील उपचार होईल, मला आरोपाने आरोपांना उत्तर द्यायचे नाही, असे शिंदे म्हणाले.
  उद्धव ठाकरे यांना टोला लगावताना एकनाथ शिंदे म्हणाले, काही लोक (उद्धव ठाकरे) पाचोऱ्यात येऊन गेले. शासन आपल्या दारी थापा मारते लय भारी असं ते म्हणाले. त्यांना मला उत्तर द्यायचे आहे. काही उद्धट बोलतात हे बसले अडीच वर्ष घरी, माहिती घेतात वरी वरी पण आमच शासन जातयं घरोघरी. लाभार्थ्यांना देतोय स्टेजवरी, सामान्यांसाठी अहोरात्री काम करी म्हणून  लाखोंची गर्दी होते कार्यक्रमावरी.
  लोक उगाच शासना आपल्या दारी कार्यक्रमात येत नाहीत. ते (उद्धव ठाकरे) घरी बसले आम्ही लोकांच्या दारी जातोय. आम्ही काम करतोय त्याचा चांगला प्रत्यय येतो. हे गरीबांचे सरकार आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
  मुख्यमंत्री ऋषी सुनक यांना भेटलो
  एकनाथ शिंदे म्हणाले, “मी जी २० मध्ये सहभागी झालो. मला ऐतिहासीक कार्यक्रम पाहायचं भाग्य मिळालं. कार्यक्रमात भारताचा ठसा मोदींनी उमटवला. तरी देखील विरोधकांची पोटदुखी वाढली आहे. ज्यांच सरकार गेलं. त्यांच्या मनावरचा ताबा गेलाय. ते (उद्धव ठाकरे) म्हणाले मी ब्रिटनच्या पंतप्रधानांना भेटलो.  महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ऋषि सुनक यांना भेटतो. मला देखील अभिमान वाटतो.
  दरवर्षी लंडनला येतात
  ऋषि सुनक मला म्हणाले, HOW IS UT. मी म्हणालो WHY…? तर ऋषि सुनक म्हणाले, ते दरवर्षी लंडनला येतात, प्रॉपर्टी बनवतात. थंडगार हवा खातात. त्यांच खूप माझ्याकडं आहे. लंडनला आले की मी तुम्हाला सगळं सांगतो.”
  “आम्हाला सगळं माहिती आहे. आम्हाला बोलण्याची वेळ येऊ देऊ नका नाहीतर पाटणकर काढा घेण्याची वेळ आपल्यावर येईल. मला टीका करायची नाही. मी कुणाला भेटलो तर यांना जळते.  यांनी बोलतांनी तारतम्य ठेवावे”, असा इशारा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.