पुणे रेल्वे स्थानकातील यार्डामधील डब्याला आग; कारण अद्याप अस्पष्ट

पुणे रेल्वे स्थानकामध्ये आगीची घटना घडली आहे. स्थानकावर उभ्या असणाऱ्या रेल्वेच्या डब्यांना ही आग (Fire Case) लागली. मध्यरात्रीच्या सुमारास ही आग लागली असून आगीमध्ये डब्बा जळून खाक झाक झाला.

    पुणे : पुणे रेल्वे स्थानकामध्ये (Pune Railway Station) आगीची घटना घडली आहे. स्थानकावर उभ्या असणाऱ्या रेल्वेच्या डब्यांना ही आग (Fire Case) लागली. मध्यरात्रीच्या सुमारास ही आग लागली (fire at Pune Railway Station) असून आगीमध्ये डब्बा जळून खाक झाक झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी यामध्ये झालेली नाही.

    पुणे रेल्वे स्थानकातील यार्डवर रेल्वेगाड्या थांबवल्या जातात. गाड्यांची स्वच्छता या यार्डमध्ये केली जाते. मात्र मध्यरात्री दोनच्या सुमारास या यार्डमध्ये असणाऱ्या रेल्वेगाडीच्या एका डब्ब्याला आग लागली. अचानक लागलेल्या या आगीमध्ये गाडीचा डब्बा जळाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. चार बंब आणि टँकर घटनास्थळी दाखल झाले. अग्नीशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. स्टेशनवरील यार्डात रेल्वेगाडी थांबली असल्याने त्यामध्ये प्रवासी नव्हते. आगीत एक डबा पूर्णपण जळाला असून, दोन डब्यांना आगीची झळ पोहोचली आहे. मात्र आगीमागचे कारण अद्याप समोर आलेले नाही.