आचारसंहितेचा फटका! पुणे विद्यापीठातील नियुक्त्या लांबणार; आता मुलाखती ‘या’ महिन्यात

लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्याने विद्यापीठांमधील प्रस्तावित नियुक्त्या रखडणार आहेत. निवडणूक आयोगाकडून याबाबत नियम स्पष्ट केले असल्याने या नियुक्त्यांसाठी आता जून महिना उजाडणार आहे.

  पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्याने विद्यापीठांमधील प्रस्तावित नियुक्त्या रखडणार आहेत. निवडणूक आयोगाकडून याबाबत नियम स्पष्ट केले असल्याने या नियुक्त्यांसाठी आता जून महिना उजाडणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नियुक्त्याही यामुळे लांबणार आहेत.

  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलसचिव, अधिष्ठाता या पदांसाठी मुलाखती आता जून महिन्‍यापर्यंत घेता येणार नसल्याचे स्‍पष्ट होत आहे. यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आचारसंहिता काळात कोणत्‍याही विद्यापीठांना कोणत्‍याच पदाच्‍या मुलाखती घेता येणार नसल्‍याचे सूचित केले आहे. त्‍यामुळे आता या पदाच्‍या नियुक्‍तीसाठी जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

  राज्यातील एका विद्यापीठाने आचारसंहितेच्या काळात मुलाखती घेता येतील का? याबाबत निवडणूक अधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. मात्र, आचारसंहिता लागू झाल्यानंतर मुलाखती घेता येणार नसल्याचे विद्यापीठाला कळविण्यात आले. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नियुक्त्याही रखडणार आहेत.

  विद्यापीठाच्या कुलसचिव, अधिष्ठाता आणि सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेजेस संचालक या महत्त्वाच्या पदावर सध्या प्रभारी व्यक्तींना नियुक्त करण्यात आले आहे. मात्र, या सर्व पदांसाठी अर्ज केलेल्या व्यक्तींकडून मुलाखती केव्हा घेतल्या जाणार आहेत, याबाबत विचारणा केली जात आहे.

  कार्यभार प्रभारी अधिकाऱ्यांकडेच

  दरम्‍यान, अधिष्ठाता पदासाठी आरक्षण लागू आहे किंवा नाही, याबाबत विद्यापीठाने शासनाकडे पत्रव्यहार केला आहे. त्यासंदर्भातील उत्तर अद्याप विद्यापीठाला प्राप्त झाले नाही. कुलसचिव अधिष्ठाता आणि सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेजेसच्या संचालकपदाच्या मुलाखती घेणेही शक्य नाही. परिणामी निवडणुकीपर्यंत विद्यापीठाचा कार्यभार प्रभारी अधिकाऱ्यांकडेच राहणार आहे.