पिंपरीमध्ये भीषण अपघात; कंटेनरच्या धडकेत महाविद्यालयीन तरुणी ठार

    पिंपरी : कंटेनरने दिलेल्या धडकेत महाविद्यालयीन तरुणीचा जागीच मृत्यू झाला. चाकण–आंबेठाण रस्त्यावरील झित्राईमळा (ता. खेड) हद्दीतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेसमोर गुरुवारी (दि. १०) सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. चाकण पोलिसांनी याप्रकरणी शाम प्रकाश पाल (वय २३, रा. मिझापूर) या कंटेनर चालकावर गुन्हा दाखल केला असून, सानिका अनिल कोकाटे (वय १८, रा. बिरदवडी, ता. खेड, मूळ रा. जुन्नर) असे या अपघातात ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे.

    तिचा मामा बाळू नामदेव मातेले (वय ४५, रा. बिरदवडी, ता. खेड, मूळगाव सुराळे, ता. जुन्नर) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

    सानिका ही राजगुरुनगर येथील महाविद्यालयात डिप्लोमाचे शिक्षण घेत होती. गुरुवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तिचा मामा बाळू मातेले हे सानिकाला कॉलेजला सोडण्यासाठी आपल्या दुचाकीवरून घेऊन जात असताना हा अपघात झाला. चाकण पोलीस अधिक तपास करीत  आहे.