आ. रोहित पवारांच्या विशेष प्रयत्नातून मतदारसंघातील आयटीआयचे रूप पालटले!

आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून कर्जत व जामखेडमधील संस्थात्मक व्यवस्थापन समितीची जबाबदारी भारत फोर्ज आणि पियाजियो या जगप्रसिद्ध कंपन्यांना देण्यात आली होती. कर्जतला इन्स्टिट्युशनल डेव्हलपमेंट प्लॅन मंजूर झाला असून त्यामुळे आयटीआयला असणारे फंड्स या मंजुरीमुळे संस्थेला वापरता येतील व संस्थेच्या गुणवत्ता वाढीसाठी व दुरुस्तीसाठी लागणारा निधी या मंजुरीमुळे वापरता येणार आहे.

    कर्जत/ जामखेड : कर्जत व जामखेडमधील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या सक्षमीकरणासाठी व एकूणच शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी आमदार रोहित पवार सतत प्रयत्नशिल असल्याचे पाहायला मिळाले. आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून कर्जत व जामखेडमधील संस्थात्मक व्यवस्थापन समितीची जबाबदारी भारत फोर्ज आणि पियाजियो या जगप्रसिद्ध कंपन्यांना देण्यात आली होती. कर्जतला इन्स्टिट्युशनल डेव्हलपमेंट प्लॅन मंजूर झाला असून त्यामुळे आयटीआयला असणारे फंड्स या मंजुरीमुळे संस्थेला वापरता येतील व संस्थेच्या गुणवत्ता वाढीसाठी व दुरुस्तीसाठी लागणारा निधी या मंजुरीमुळे वापरता येणार आहे. यासोबतच 2022-2023 या शैक्षणिक वर्षात कर्जत येथील आयटीआयमध्ये पीपीपी या योजनेअंतर्गत ऑगस्ट 2022 या सत्रापासून नवीन व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.

    तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे बांधकाम, दुरुस्ती होऊन इतर पायाभूत सुविधा देखील तिथे उपलब्ध होणार आहेत. सदरील योजनेचा फायदा परिसरातील विद्यार्थ्यांना होणार आहे. पीपीपी योजनेमध्ये इंडस्ट्रिअल पार्टनर म्हणून भारत फोर्ज या कंपनीचे योगदान आयटीआयला मिळाले आहे.

    जामखेडमधील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस स्ट्राईव्ह अंतर्गत 2 कोटी रुपये मिळाले आहेत, त्याबरोबरच आ. रोहित पवारांनी केलेल्या प्रयत्नातून संस्थेच्या गुणवत्ता वाढीसाठी देखील परवानगी मिळाली असून त्यांच्या सहकार्यातून चालू शैक्षणिक वर्षात नवीन अभ्यासक्रमानुसार लागणारी यंत्रसामुग्री उपलब्ध झाली असून सदरील योजनेअंतर्गत नवीन व्यवसाय अभ्यासक्रमदेखील सुरू होणार आहेत.

    जामखेड आयटीआयचे इंडस्ट्रियल पार्टनर पियाजियो या कंपनीमार्फत विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी 1 हजार लिटर प्रति तास क्षमतेचे आरओ फिल्टर व बिएस-6 इंजिन संस्थेस उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासोबतच जामखेडमधील गेल्या 11 वर्षांपासून बंद असलेल्या विद्यार्थी वसतिगृहाचे दुरुस्तीचे काम रोहित पवारांच्या प्रयत्नातून सुरू झाले असून यंदाच्या वर्षी 50 विद्यार्थ्यांना राहण्यासाठी हे वसतिगृह उपलब्ध होणार आहे.