शिक्षण आयुक्तांनी घेतला फायलींचा ताबा; माध्यमिक शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना फुटला घाम

शिक्षण आयुक्त सुरज मांढरे (Suraj Mandhre) यांनी जिल्हा परिषदेला (ZP) भेट दिल्यावर माध्यमिक शिक्षण विभागातील फायली ताब्यात घेतल्याने कर्मचाऱ्यांना घाम फुटला आहे. यात माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी यापूर्वी मान्यता दिलेल्या ४३ जणांच्या नियुक्त्या बेकायदेशीर असल्याचे प्रकरण समोर आले आहे.

  सोलापूर : शिक्षण आयुक्त सुरज मांढरे (Suraj Mandhre) यांनी जिल्हा परिषदेला (ZP) भेट दिल्यावर माध्यमिक शिक्षण विभागातील फायली ताब्यात घेतल्याने कर्मचाऱ्यांना घाम फुटला आहे. यात माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी यापूर्वी मान्यता दिलेल्या ४३ जणांच्या नियुक्त्या बेकायदेशीर असल्याचे प्रकरण समोर आले आहे.

  महाराष्ट्र शासनाने नवीन शिक्षक भरतीवर ४ मे २०२० पासून निर्बंध लागू केले आहेत. तरीदेखील सोलापूर माध्यमिक शिक्षण विभागाने तब्बल ४३ जणांना मान्यता दिल्याची बाब उघड झाली आहे. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी झेडपी ला भेट दिल्यावर माध्यमिक शिक्षण विभागात जाऊन टेबलावरच्या फाईली ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. या फाईली प्रलंबित का राहिल्या याच्या कारणाचा शोध घेण्यात येणार आहे. तसेच यापूर्वी आलेल्या तक्रारीवरून संबंधित प्रकरणांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यात ४३ शिक्षकांच्या नियुक्ती नियमबाह्य असल्याचे आढळले आहे.

  ४३ जणांना मान्यता दिलीच कशी?

  शिक्षण उपसंचालक या प्रकरणांची सुनावणी घेऊन मान्यता रद्द करणार आहेत. प्राथमिक शाळांवरील शिक्षकांसाठी ‘टीईटी’ तर माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागांतर्गत शिक्षक भरतीसाठी ‘टेट’ बंधनकारक करण्यात आले आहे. पण, अनेक संस्थापकांनी त्यांच्या शाळा-महाविद्यालयात रिक्त पदांवर यापूर्वीच शिक्षक नेमले आहेत. माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांना भरतीवरील बंदीची माहिती असतानाही ४३ जणांना मान्यता दिलीच कशी, या प्रमुख प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्याची चौकशी होणार आहे. त्या शिक्षकांना अजून शासनाकडून वेतन सुरू झालेले नाही, पण चुकीच्या पद्धतीने दिलेल्या मान्यता आता सुनावणी घेऊन रद्द केल्या जाणार आहेत. त्यासंबंधीची संपूर्ण माहिती शिक्षण उपसंचालकांनी मागविली आहे.

  सुनावणी घेऊन मान्यता होतील रद्द

  राज्यभरात शिक्षक मान्यता बंद असतानाही सोलापूर माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी ४३ जणांना मान्यता दिली आहे. हे मान्यता कोणी दिली व कशी दिली याची चौकशी केली जाणार आहे शिक्षक मान्यतेच्या या फाईली कोणत्या कर्मचाऱ्यांमार्फत शिक्षणाधिकाऱ्याकडे गेल्या याची माहिती घेतली जात आहे.

  कर्मचाऱ्यांना फुटला घाम…

  शिक्षण आयुक्त मांढरे यांनी माध्यमिक शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या ताब्यातील पाहिली तपासणीसाठी ताब्यात घेतल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांना घाम फुटला आहे. शिक्षक मान्यतेमध्ये काही कर्मचारी आपला स्वतःचा रस दाखवून बेकायदेशीर फाइली शिक्षणाधिकाऱ्यापर्यंत पोहोचवत असल्याचे निदर्शनाला आले आहे. यातून संबंधित कर्मचाऱ्यांनी मोठी माया गोळा केली असल्याचेही आता बोलले जात आहे. ४३ शिक्षकांच्या मान्यता रद्द झाल्या तर यामध्ये किती व्यवहार झाले हे उघड होणार असल्याचे आता सांगितले जात आहे.