केडीएमसी आयुक्तांनी भाकरी फिरवली, उपायुक्तांचा केला खातेबदल

महापालिकेच्या परिमंडळ एकचा उपायुक्त पदाचा पदभार धैर्यशील जाधव यांच्याकडे होता. तो काढून घेण्यात आला आहे. त्यांच्याकडे सध्या शिक्षण विभागाचे उपायुक्त पद दिले आहे.

    कल्याण – अमजद खान : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त डॉ इंदूराणी जाखड यांनी आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यापासून जंबो बैठकाचा धडाका लावला आहे. महिन्याभरात घेतलेल्या बैठकापश्चात त्यांनी आज उपायुक्तांकडे असलेला खातेबदल केला आहे. त्यांच्या या खातेबदलानंतर प्रशासनाच्या कामकाजात काही फरक पडणार का नाही. हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यांनी भाकरी करपण्याआधी भाकरी फिरविण्याचा प्रयत्न खातेबदलातून केला आहे.
    महापालिकेच्या परिमंडळ एकचा उपायुक्त पदाचा पदभार धैर्यशील जाधव यांच्याकडे होता. तो काढून घेण्यात आला आहे. त्यांच्याकडे सध्या शिक्षण विभागाचे उपायुक्त पद दिले आहे. परिमंडळ एकचा उपायुक्त पदाचा पदभार हा उपायुक्त प्रसाद बोरगावकर यांच्याकडे देण्यात आला आहे. प्रसाद बोरगावकर यांच्याकडे अनधिकृत बांधकाम विभागाचा पदभार होता. त्यांच्याकडून तो पदभार काढून घेण्यात आला आहे. अनधिकृत बांधकाम विभागाच्या उपायुक्त पदाचा पदभार उपायुक्त अवधूत तावडे यांच्याकडे देण्यात आला आहे. यापूर्वी फेरीवाला विभाग हा तावडे यांच्याकडे देण्यात आला होता. आत्ता ते अनधिकृत बांधकाम विभागाच्या उपायुक्त पदाचे कामकाज पाहणार आहे.
    सामन्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त अर्चना दिवे यांच्याकडे विधी विभागाचा पदभार होता. तो त्यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे. त्यांच्यावर माहिती आणि तंत्रज्ञान यांच्यासह निवडणूक विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मालमत्ता विभागाच्या उपायुक्त वंदना गूळवे यांच्याकडे विविध प्रकल्पाचे भूसंपादन आणि पुनर्वसन या विभागाचा अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला आहे. आयुक्तांनी केलेला हा खातेबदल हा प्रशासनाचे कामकाज सुधारण्यासाठी कितपत उपयुक्त ठरतो. हे लवकर स्पष्ट होणार आहे.