
सापनाथ आणि नागनाथ एकत्र आले तर ते विषच ओकणार, असा टोला फडणवीस यांनी या भेटीबाबत लगावलाय. सध्या ठाकरे आणि केजरीवाल यांना एकमेकांची गरज आहे. ते एकत्र आल्यानं नरेंद्र मोदींचं सरकार पडणार नाही, असंही फडणवीस म्हणालेत.
मुंबई – दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी बुधवारी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांची मातोश्री या निवासस्थआनी भेट घेतली. या भेटीची तुलना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी सापनाथ आणि नाथनाथाच्या भेटीशी केली आहे. सापनाथ आणि नागनाथ एकत्र आले तर ते विषच ओकणार, असा टोला फडणवीस यांनी या भेटीबाबत लगावलाय. सध्या ठाकरे आणि केजरीवाल यांना एकमेकांची गरज आहे. ते एकत्र आल्यानं नरेंद्र मोदींचं सरकार पडणार नाही, असंही फडणवीस म्हणालेत. तर संजय राऊत यांनी या टीकेला जोरदार उत्तरं दिलंय.
सापनाथ आणि नागनाथाची पूजा करतात- राऊत
आपल्या देशात सापनाथ आणि नागनाथाची पूजा केली जाते. हे हिंदू म्हणवणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना माहित नाही का, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. मातोश्रीनी नातं जपली असं सांगताना फडणवीसांकडून बाळासाहेब ठाकरे समजून घेण्याची वेळ अद्याप आलेली नाही, अशी टीकाही राऊतांनी केलीय.
आमच्याकडे एकनाथ- उदय सामंत
सापनाथ आणि नागनाथ यांच्यावरुन भाजपा आणि ठाकतरे गटात जुंपलेली असतानाच शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही या वादावर प्रतिक्रिया दिलीय. विरोधकांकडे सापनाथ-नागनाथ असले तर आमच्याकडे एकनाथ आहेत. असं सांगत त्यांनी ठाकरे गटाला टोला लगावला आहे.
ठाकरे-केजरीवाल भेटीत काय
नातं जपण्याची मातोश्रीची परंपरा आहे, असं सांगत उद्धव ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल यांचं मातोश्रीवर बुधवारी स्वागत केलं होतं. दुसऱ्यांदा ते मातोश्रीवर आल्याचंही ठाकरेंनी आवर्जून सांगितलं. तर ठाकरे कुटुंबांपैकीच आता आपण एक असल्याचं केजरीवाल म्हणाले होते. देशातील लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आल्याचं यावेळी दोन्ही नेत्यांनी सांगितलं होतं.
फडणवीसांकडून बाळासाहेब समजून घेण्याची वेळ आली नाही
दरम्यान, राऊत म्हणाले की, ज्या बाळासाहेबांनी आयुष्यभर विरोध केला. सध्या त्यांना मातोश्रीवर बटाटे वडे दिले जाताहेत, व आमच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे बंद केले आहेत, अशी टिका देवेंद्र फडणवीसांनी केली होती. यावर बोलताना राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांकडून आम्हाला बाळासाहेब समजून घेण्याची वेळ आली नाही. अजून एवढी वाईट वेळ आली नसल्याचा टोला राऊतांनी फडणवीसांना लगावला.