गाळप न झालेल्या ऊसाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्या; किसान सभेची मागणी

नगर पाठोपाठ बीडमधील एका तरुण ऊस उत्पादक शेतकऱ्याने साखर कारखाना ऊसतोड देत नसल्याच्या हतबलतेतून उभा ऊसाचा फड पेटवून देत शेतातच झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे.

    अहमदनगर : नगर पाठोपाठ बीडमधील एका तरुण ऊस उत्पादक शेतकऱ्याने साखर कारखाना ऊसतोड देत नसल्याच्या हतबलतेतून उभा ऊसाचा फड पेटवून देत शेतातच झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातही अशाच पद्धतीने ऊस पेटवून देत वृद्ध हतबल झालेल्या शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केली होती.

    राज्यात मोठ्या प्रमाणात यंदा ऊस लागवड झाली असून, ऊसाच्या गाळपाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि त्यातून शेतकरी आत्महत्येकडे वळू शकतो, अशी भीती किसान सभेने या पूर्वीच साखर आयुक्तांना दिल्याची माहिती किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी दिली आहे. मात्र, शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आणि व्यक्त केलेल्या भीती प्रमाणे आता ऊस गळपाला जात नसल्याने शेतकरी हतबल होऊन आत्महत्या करू लागला असल्याचे ते म्हणाले.

    अनेक कारखान्यांचे गाळप आता बंद होत असून, कार्यक्षेत्रातील शिल्लक ऊसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. शासनाने महसूल आणि कृषी विभागाकडून तातडीने शिल्लक ऊसाचे पंचनामे करून एकरी चाळीस टन याप्रमाणे एफआरपी संबंधित शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी किसान सभेच्या वतीने डॉ. नवले यांनी केली आहे. शासनाने शिल्लक ऊसाचे तातडीने नियोजन करून गाळप करावे किंवा पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अन्यथा राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरू राहू शकते. वेळ पडल्यास किसान सभा याबाबत सरकार विरोधात आंदोलन पुकारले असा इशाराही त्यांनी दिला आहे.