गोल्डन अवरमध्ये तक्रारादाराचे फसवणुकीतील पैसे सुरक्षित, सायबर गुन्ह्यांत फसवणूक; कोंढवा पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी

सायबर गुन्ह्यांत प्रचंड वाढ आणि कोट्यवधी रुपयांची फसवणूक होत असताना नोकरदार तरुणाच्या पैशांवर सायबर चोरट्यांनी डल्ला मारला खरा, पण तक्रारदार सतर्कतेने व पोलिसांच्या तत्परतेने फसवणूक झालेले पैसे सुरक्षित राहिले आहेत. कोंढवा पोलिसांनी गोल्डन अवरमध्ये तक्रारदार आल्यानंतर काही क्षणात सायबर चोरट्यांपासून ही रक्कम सुरक्षित केली आहे

    पुणे :  सायबर गुन्ह्यांत प्रचंड वाढ आणि कोट्यवधी रुपयांची फसवणूक होत असताना नोकरदार तरुणाच्या पैशांवर सायबर चोरट्यांनी डल्ला मारला खरा, पण तक्रारदार सतर्कतेने व पोलिसांच्या तत्परतेने फसवणूक झालेले पैसे सुरक्षित राहिले आहेत. कोंढवा पोलिसांनी गोल्डन अवरमध्ये तक्रारदार आल्यानंतर काही क्षणात सायबर चोरट्यांपासून ही रक्कम सुरक्षित केली आहे. त्यामुळे तक्रारदार तसेच नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक संजय मोगले, संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार शेलार यांनी ही कामगिरी केली

    मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार कोंढवा भागात राहण्यास आहेत. ते एका नामांकित खासगी कंपनीत नोकरी करतात. त्यांना सायबर चोरट्यांनी संपर्क साधला तसेच आपण कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. तक्रारदार यांच्या मोबीविकच्या ई वॉलेटचा आयडी व पासवर्ड काढून घेतला. त्यानंतर त्यांच्या ई वॉलेटमधील ६० हजार रुपये काढून घेतले. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी कोंढवा पोलिसांकडे धाव घेतली. तेव्हा सायबर विभागातील पोलीस शिपाई शेलार यांना याची माहिती दिली. त्यांनी तातडीने कंपनीला ई मेल करुन तक्रार केली. कंपनीशी स्वत: फोनवर बोलत याबाबत माहिती दिली. तेव्हा पाहणी केली असता सायबर चोरट्यांनी त्यांच्या ई वॉलेटमधून काढलेल्या ६० हजार रुपयांपैकी दीड हजार रुपये दुसरीकडे वळविले होते. ते वगळता उरलेले ५८ हजार ५०० रुपये कंपनीने तातडीने गोठवले व ते पुन्हा तक्रारदार यांच्या ई वॉलेटमध्ये वळते केले. कंपनीकडून तसे पत्र देखील पोलिसांना प्राप्त झाले आहे. यानंतर तक्रारदारांनी पोलिसांचे आभार मानले.

    सायबर गुन्ह्यात मोठी वाढ झालेली आहे. अनोळखी व्यक्ती, ऑनलाईनच्या माध्यमातून माहिती नसताना खरेदी करणे किंवा पैसे पाठविणे पुर्ण खात्रीकरूनच करावे. तरीही फसवणूक झाल्यास तत्काळ त्याची माहिती सायबर विभाग अथवा स्थानिक पोलिसांना द्यावी. गोल्डन अवरमध्ये तक्रार आल्यास फसवणूकीतील रक्कम सुरक्षित करण्यात येऊ शकते. परंतु, त्याला वेळेत तक्रार येणे गरजेचे आहे.

    संतोष सोनवणे, वरिष्ठ निरीक्षक, कोंढवा पोलीस ठाणे