‘पालखी मार्गाची कामे २० जूनपर्यंत पूर्ण करा’; विभागीय आयुक्तांच्या कडक सूचना

पंढरपूर श्री संत ज्ञानेश्वर व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाह अन्य संताच्या पायी दिंडी पालखी सोहळ्याबरोबर मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक चालत येतात. पायी पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये. यासाठी पालखी मार्गावरील कामे २० जूनपर्यंत पूर्ण करावीत. पायाला मुरुम, दगड लागणार नाहीत.

    पंढरपूर : पंढरपूर श्री संत ज्ञानेश्वर व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाह अन्य संताच्या पायी दिंडी पालखी सोहळ्याबरोबर मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक चालत येतात. पायी पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये. यासाठी पालखी मार्गावरील कामे २० जूनपर्यंत पूर्ण करावीत. पायाला मुरुम, दगड लागणार नाहीत, याची दक्षता घेवून मार्गावरील स्वच्छता करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव (Saurabh Rao) यांनी दिल्या.

    शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे आषाढी वारी पूर्वतयारी नियोजन आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार समाधान आवताडे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

    सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करा

    पालखी  मार्गावर तसेच पालखी मुक्कामाच्या ठिकाणी भाविकांना पिण्याचे पाणी, आरोग्य, स्वच्छता यासह आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत नियोजन करावे. आषाढी यात्रा कालावधीत मोठ्या प्रमाणात वारकरी-भाविक पंढरपूरात येतात. नगरपालिकेने यात्रा कालावधीत स्थानिक लोकसंख्या व येणाऱ्या भाविकांची संख्या विचारात घेऊन मुबलक प्रमाणात पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी. शहरातील नगरपालिकेच्या बोअरवेलसह खासगी बोअरवेलद्वारे पाणीपुरवठा करावा. आवश्यकतेनुसार इतर जिल्ह्यातून टॅंकरची मागणी करावी.