भाजपसह महायुतीची चिंता वाढणार, यशवंत सेना निवडणुकीच्या रिंगणात; 6 उमेदवार जाहीर

अनेक वेळा आंदोलन मोर्चे काढून देखील धनगर समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आता यशवंत सेनेने लोकसभेच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यशवंत सेनेचे बाळासाहेब दोडतले यांनी पत्रकार परिषद घेऊन लोकसभेचेच्या सहा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

    बीड : अनेक वेळा आंदोलन मोर्चे काढून देखील धनगर समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आता यशवंत सेनेने लोकसभेच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यशवंत सेनेचे बाळासाहेब दोडतले यांनी पत्रकार परिषद घेऊन लोकसभेचेच्या सहा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

    पहिल्या टप्प्यात एकूण सहा उमेदवार जाहीर झाले असून, यामध्ये सोलापूर, माढा, रावेर अहमदनगर, धुळे आणि कोल्हापूर या मतदारसंघाचा समावेश आहे. तर या लोकसभेच्या निवडणुकीत एकूण 15 उमेदवार यशवंत सेनेच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात येणार आहेत.

    यशवंत सेनेच्या वतीने संजय अण्णा क्षीरसागर यांना सोलापूरची उमेदवारी देण्यात आली. तर अण्णासाहेब रुपनर यांना माढा इथून उमेदवारी देण्यात आली. समाधान बाजीराव पाटील यांना रावेर येथील उमेदवारी देण्यात आली. तर अहिल्यानगर येथून गंगाधर कोळेकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. धुळे येथून हिरालाल कन्नूर हे यशवंत सेनेचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. तर कोल्हापूर मधून जयसिंग आप्पा सुतार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

    सध्याचे सरकार हे धनगर विरोधी सरकार असल्याची टीका बाळासाहेब दोडतले यांनी केली असून, निवडणुकीच्या रिंगणात उतरूनच सरकारला उत्तर देण्याचा निर्णय यशवंत सेनेने घेतला आहे.