शिवसेनेचा धगधगता इतिहास पाहिलेले…; राज ठाकरेंसह उद्धव ठाकरे,एकनाथ शिंदेंनी सांगितल्या मनोहर जोशींच्या आठवणी

राज्याचे माजी मुख्यमंत्री व कट्टर शिवसैनिक म्हणून काम केलेले मनोहर जोशी यांचे निधन झाले. यामुळे राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे

    मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री व कट्टर शिवसैनिक म्हणून काम केलेले मनोहर जोशी यांचे निधन (Manohar Joshi passed away) झाले. यामुळे राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यासोबत काम केलेले मनोहर जोशी हे शिवसेनेचे (Shiv Sena) मुख्यमंत्री व लोकसभा अध्यक्ष राहिले होते. त्यांच्या निधनानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी प्रतिक्रिया देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याचबरोबर अनेक राजकारण्यांनी मनोहर जोशी यांच्यासोबतच्या आठवणी सांगितल्या आहेत.

    शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी देखील माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली. बुलढाणा जिल्ह्याच्या दौ्ऱ्यावर बोलताना म्हणाले, मनोहर जोशी सच्चे शिवसैनिक होते. बेळगाव-कारवार सीमा आंदोलनात बाळासाहेब ठाकरे यांना अटक झाली, तेव्हा त्यांच्यासह मनोहर जोशी आणि दत्ता साळवीही होते. जीवाला जीव देणारे निष्ठावंत शिवसैनिक आपल्यातून निघून जात आहेत, हे आपले दुर्दैव आहे. मी आता मुंबईला निघालो आहे. शिवसेना परिवाराच्या वतीने मनोहर जोशींना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. मनोहर जोशी पहिल्या फळीतील शिवसैनिक होते. जोशी यांच्यासारख्या जीवाला जीव देणाऱ्या शिवसैनिकांमुळे शिवसेना अनेक संकटावर मात करून वेळोवेळी उभी राहिली. अशी आठवण उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

    त्याचबरोबर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना श्रद्धांजली अर्पण केली. ट्वीट करत मुख्यमंत्री शिंदे यांनी लिहिले आहे की, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रचंड निष्ठा असलेले आणि त्यांना अपेक्षित महाराष्ट्र घडवण्यासाठी मनापासून योगदान देणारे एक शिस्तबध्द आणि खंबीर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. महाराष्ट्र, मराठी माणसाविषयी त्यांना मनापासून आत्मीयता होती. महाराष्ट्राच्या राजकारणातला अभ्यासू आणि सुसंस्कृत चेहरा ही त्यांची ओळख. सर, अतिशय नम्र, संयमी, हजरजबाबी आणि शिस्तप्रिय होते. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील त्यांची कामगिरी, योगदान आमूलाग्र बदल घडवणारे होते. शिक्षण शिवसेना – भाजप युतीच्या सरकारचे नेतृत्व सरांनी केले. सर्वांना सोबत घेऊन, भूमिकांचा आदर करून वाटचाल करण्याचे कसब त्यांच्याकडे होते. शिवसेनेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मला लाभली, हे मी माझे भाग्य समजतो. आज आपण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रामाणिक असलेला एक कडवट, सच्चा शिवसैनिक गमावला आहे. अशा भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या.

    मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील मनोहर जोशी यांना ट्वीटच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. राज ठाकरे यांनी लिहिले आहे की, “मनोहर जोशी सरांचं निधन झालं. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यापासून त्यांच्या सोबतच्या पहिल्या फळीतील ते ज्येष्ठ नेते. शिवसेनेची धाटणीच आक्रमक, पण त्यात अजातशत्रुत्व जपत सरांची राजकीय वाटचाल सुरु राहिली. शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर बसवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं जे मनोहर जोशींच्या रूपाने पूर्ण झालं. पुढे ते लोकसभा अध्यक्ष झाले आणि नंतर शेवटच्या श्वासापर्यंत बाळासाहेबांचे सैनिक म्हणून राहिले. १९६६ पासून शिवसेनेचा धगधगता इतिहास पाहिलेले आणि जगलेले एक शिवसैनिक, नेते आज काळाच्या पडद्याआड गेले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनोहर जोशी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.”