भिरकवलेली बाटली पालकमंत्र्यांच्या वाहनावर पडल्याने गोंधळ

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या वाहनांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयातून त्यांच्या सातारा येथील निवासस्थानी निघाला असताना पोवई नाक्यावर त्यांच्या वाहनावर अचानक बाटली पडली. हा हल्ला होता की काय, या शंकेने तणाव निर्माण झाला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर ही घटना एकाने दारुच्या नशेत केल्याचे समोर आले. याप्रकरणी नम्या यंत्र्या भोसले (वय ४५, रा. फडतरवाडी, ता. सातारा) याच्या विरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सातारा : पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या वाहनांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयातून त्यांच्या सातारा येथील निवासस्थानी निघाला असताना पोवई नाक्यावर त्यांच्या वाहनावर अचानक बाटली पडली. हा हल्ला होता की काय, या शंकेने तणाव निर्माण झाला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर ही घटना एकाने दारुच्या नशेत केल्याचे समोर आले. याप्रकरणी नम्या यंत्र्या भोसले (वय ४५, रा. फडतरवाडी, ता. सातारा) याच्या विरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत माहिती अशी की, शुक्रवारी सायंकाळी पालकमंत्री देसाई यांच्या वाहनांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयातून त्यांच्या पोवई नाका येथील निवासस्थानाकडे निघाला होता. दरम्यान पोवई नाका येथे एकाचा शेंगदाणे-फुटाण्याच्या गाडीवर वाद सुरू होता. विक्रेत्याला तो शेंगदाणे मागत होता. परंतु, तो त्याला देत नव्हता. त्यावरून दोघांची हमरीतुमरी झाली. त्याचवेळी रागाने पाण्याची बाटली हवेत भिरकावून दिली. ही बाटली पालकमंत्र्यांच्या वाहनावर पडली. त्यामुळे वाहनांचा ताफा काही वेळ तेथेच थांबला. पोलिसांच्या निदर्शनास काही बाबी आल्यानंतर त्यांनी पालकमंत्र्यांचे वाहन पुढे पाठवले व एक पोलीस व्हॅन तेथेच थांबली. या घटनेची माहिती समजताच वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. पोवई नाक्यावर मोठ्या प्रमाणात पोलीस दाखल झाल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला होता.

    संशयितावर प्रतिबंधात्मक कारवाई

    बाटली फेकणाऱ्याला ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात आणण्यात आले. दरम्यान सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करुन हा हल्ला की अनावधान? याची शहानिशा पोलिसांनी केली. सुमारे दोन तासाच्या तपासानंतर शेंगदाणे दिले नाहीत म्हणून बाटली फेकल्याचे तपासात स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांच्या जीवात जीव आला. दरम्यान, नम्या हा सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा करत होता. त्याला ताब्यात घेत वैद्यकीय तपासणी केली असता त्याने मद्यप्राशन केल्याचे समोर आले. यानुसार त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. पोलीस सुशांत कदम यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.