शासनाच्या घोषणेने लाभार्थ्यांमध्येच संभ्रम; अंत्योदय कुटुंबास मोफत साडीचा ‘घोळ’

अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापणा व आगामी होळी सणासाठी केंद्र व राज्य सरकारने दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्यासह अंत्योदय योजनेच्या लाभार्थी कुटुंबियांस प्रत्येकी एक साडी मोफत देण्याचे जाहीर केले आहे.

    नाशिक : अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापणा व आगामी होळी सणासाठी केंद्र व राज्य सरकारने दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्यासह अंत्योदय योजनेच्या लाभार्थी कुटुंबियांस प्रत्येकी एक साडी मोफत देण्याचे जाहीर केले आहे. प्रजासत्ताक दिन ते होळी सणापर्यंत साड्यांचे वाटप करण्याचे आदेश अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने काढले असले तरी, डिसेंबर २०२२ अखेर ज्या कुटूंबियांचे अंत्योदय योजनेत नाव होते अशांनाच मोफत साडी देण्यात येणार असल्याने त्यानंतरच्या लाभार्थ्यांचे काय, असा प्रश्न पुरवठा विभागाला पडला आहे.

    गोरगरिबांचा सण उत्साहात साजरा व्हावा यासाठी अंत्योदय योजनेच्या लाभार्थी कुटुंबातील एका व्यक्तीस रेशनमधूनच मोफत साडी वाटप करण्याचे ठरविले आहे. ३१ डिसेंबर २०२२ नंतर वर्षभरात वाढलेल्या लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे साडी वाटप करताना भेदभाव केल्याचा आरोप अन्य वंचित लाभार्थ्यांकडून होण्याची शक्यता असल्याने पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भातील आदेशात सुस्पष्टता यावी यासाठी अधिकाऱ्यांकडून शासनाकडे मार्गदर्शन मागविण्यात येणार आहे.

    अजून मागणी नोंदणी नाही

    शासनाने या संदर्भात २३ जानेवारी रोजी काढलेल्या आदेशात अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना प्रजासत्ताक दिनापासून ते होळी सणापर्यंत साड्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचे जाहीर केले असले तरी, प्रत्यक्षात अजून जिल्हा पातळीवरून यंत्रमाग महामंडळाला लाभार्थ्यांची संख्या वा यादीच सादर केलेली नाही. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त टळला आहे.