काँग्रेसने साताऱ्यातून लोकसभचे रणशिंग फुंकले; काँग्रेस विचाराचा उमेदवार देण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी

सातारा, सांगली व कोल्हापूर लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या पक्षाशी बोलून काँग्रेस विचाराचा उमेदवार देण्यात यावा, त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी हि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची राहील, अशी मागणी विधानसभा निरीक्षक, तालुकाध्यक्षांनी काँग्रेसच्या सचिव सोनलबेन पटेल यांच्याकडे केली.

  सातारा : लोकसभा निवडणुकीचा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने रणशिंग फुंकले आहे. गुरुवारी जिल्हा काँग्रेस कमिटीत आगामी लोकसभेसाठी आढावा बैठक झाली यात सातारा, सांगली व कोल्हापूर लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या पक्षाशी बोलून काँग्रेस विचाराचा उमेदवार देण्यात यावा, त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी हि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची राहील, अशी मागणी विधानसभा निरीक्षक, तालुकाध्यक्षांनी काँग्रेसच्या सचिव सोनलबेन पटेल यांच्याकडे केली.
  आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी दंड थोपटले आहेत. सध्या केंद्रात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपकडून जोरदार तयारी सुरु असून वेगवेगळ्या मंत्र्यांचे राजकीय दौरे सुरु आहेत. आता राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने रणशिंग फुंकले असून बैठका, पक्षप्रवेश, कार्यक्रम आदींवर भर दिला आहे.
  प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री सतेज पाटील आणि विश्वजित कदम यांच्या सूचनेवरुन विधानसभा मतदारसंघ प्रभारींची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील निरीक्षक आणि तालुकाध्यक्षांची महत्वपूर्ण आढावा बैठक जिल्हा काँग्रेस कमिटीत झाली. या बैठकीत लोकसभा मतदारसंघाचा आढावा काँग्रेसच्या सचिव सोनलबेन पटेल यांनी घेतला.
  तिन्ही जिल्ह्यातील विधानसभा निरीक्षक, तालुकाध्यक्षांकडून लोकसभा मतदार संघ व विधानसभा मतदार संघांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण-पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव, ज्येष्ठ नेते अॅड. विजयराव कणसे, उदयसिंह पाटील-उंडाळकर, अजितराव पाटील-चिखलीकर, राजेंद्र शेलार, महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, नरेश देसाई आदी उपस्थित हाेते.
  गावागावात काँग्रेस विचारांचे लोक
  गावागावात काँग्रेसचा विचारांचे आजही लोक आहेत. साताऱ्यात कॉंग्रेसचा एक आमदार, सांगलीत दोन तर कोल्हापुरात ५ आमदार तर २ विधानपरिषद सदस्य असे ७ आमदार आजच्या घडीला आहेत. सातारा, सांगली व कोल्हापूर लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या पक्षाशी बोलून काँग्रेस विचाराचा उमेदवार देण्यात यावा, त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची राहील, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावर सोनल पटेल यांनी आपल्या आढावा बैठकीचा अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठवला जाईल, असे सांगितले.
  आठ दिवसात अहवाल सादर करा
  पंचायत समिती स्तरावर तत्काळ बैठक घेऊन त्यांचा अहवाल जिल्हाध्यक्षांना आठ दिवसात सादर करा, पक्षवाढीसाठी पुढाकार घ्या, जे कोणते सेल, कमिट्या अपूर्ण आहेत, त्या तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना पटेल यांनी केल्या.