काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकरही मालामाल; तब्बल ‘इतकी’ आहे संपत्ती

पुणे लोकसभा मतदार संघातील इंडिया आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याकडे चार कोटीहून अधिक मालमत्ता आहे. धंगेकर आणि त्यांची पत्नी प्रतिभा यांच्याकडे एकूण ८ कोटी १६ रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे.

  पुणे : पुणे लोकसभा मतदार संघातील इंडिया आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याकडे चार कोटीहून अधिक मालमत्ता आहे. धंगेकर आणि त्यांची पत्नी प्रतिभा यांच्याकडे एकूण ८ कोटी १६ रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. तर धंगेकर यांच्या नावावर ३५ लाख ७३ हजार रुपयांचे कर्ज, तर पत्नीच्या नावावर ३२ लाख ४२ हजार रुपयांचे कर्ज आहे. धंगेकर यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रात ही माहिती नमूद केली आहे.

  एक वर्षापूर्वी झालेल्या कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत धंगेकर आणि त्यांच्या पत्नीकडे एकूण ८ कोटी ३६ लाख १० हजार रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता होती. तर धंगेकर यांच्या नावावर ३५ लाख ७३ हजार रुपयांचे कर्ज तर पत्नीच्या नावावर ३२ लाख ८ हजार रुपयांचे कर्ज होते.

  लोकसभा निवडणुकीसाठी धंगेकर यांनी गुरुवारी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जावरून यांच्याकडे एकूण ४ कोटी ८२ लाख ९० हजार रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. तर पत्नीच्या नावे एकूण ३ कोटी ३३ लाख ११ हजार रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. धंगेकर आणि त्यांच्या पत्नीकडे एकूण ८ कोटी १६ लाख रुपयांची मालमत्ता आहे. यावरून एक वर्षात धंगेकर यांची एकूण मालमत्ता २० लाख रुपयांनी कमी झाली आहे.

  मात्र धंगेकर यांच्या नावावरील कर्जाची रक्कम आहे तेवढीच असून पत्नीने घेतलेल्या कर्जाच्या रक्कमेत ३४ हजाराने वाढ झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. धंगेकर यांनी मागील आर्थिक वर्षात ( २०२३-२४) ८ लाख ७ हजार रुपये वार्षिक उत्पन्न असल्याचे नमूद केले आहे.

  शेती व सोने-चांदी कारागिरी असा त्यांचा व्यवसाय असल्याचे नमूद केले आहे. तसेच धंगेकर यांचे शिक्षण आठवीपर्यंत झाले आहे. धंगेकर यांच्याकडे रोख रक्कम ७६ हजार रुपये आहे. तर पत्नीकडे रोख रक्कम ६२ हजार रुपये आहे. विविध बॅंकांमधील ठेवी, म्युच्युअल फंड, एल आयसी मध्ये गुंतवणूक केली असून, या जंगम मालमत्तेची एकूण किंमत २३ लाख २६ हजार रुपये इतकी आहे. तर पत्नीकडे ७२ लाख ३८ हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे.

  धंगेकर यांच्याकडे ॲक्टिव्हा, बुलेट अशा दोन दुचाकी आहेत. पत्नीच्या नावावर कोणतेही वाहन नसल्याचे नमूद केले आहे. तर धंगेकर यांच्याकडे १० तोळे सोने असून, त्याची किंमत ६ लाख ४५ हजार इतकी आहे. तर पत्नीकडे १५ तोळे असून त्याचे मूल्य ९ लाख ८७ हजार इतके आहे. त्यांच्या पत्नीचा शेती व बांधकाम व्यवसाय आहे.

  धंगेकर यांच्यावर विविध ठिकाणी केलेल्या आंदोलनप्रकरणी शिवाजीनगर, समर्थ पोलिस स्टेशन, बंडगार्डन पोलिस स्टेशन, विश्रामबाग चतुश्रृंगी पोलिस स्टेशन आणि निगडी पोलिस स्टेशनमध्ये एकूण आठ गुन्हे दाखल असल्याचे नमूद केले आहे.

  दौंड आणि नांदोशीसह कोथरूडमध्ये जमिन

  धंगेकर यांच्याकडे दौंडमधे पिंपळगाव येथे सुमारे तीन एकर जमीन आहे. हवेलीमध्ये नांदोशी येथे १७ गुंठे जमीन आहे. या जमिनीची चालू किंमत ८६ लाख ५८ हजार इतकी आहे. तसेच कोथरूड येथे ४ हजार ५०० चौरस फूट बिगरशेती जमीन असून, त्याची चालू किंमत १ कोटी ६७ लाख २६ हजार इतकी आहे. तर रविवार पेठ, मंगळवार पेठ, कसबा पेठ आणि शिवाजीनगर येथे निवासी इमारतीमध्ये एकूण सहा मिळकती आहेत.

  धंगेकर यांच्याकडील स्थावर मालमत्तेची एकूण किंमत ४ कोटी ५९ लाख इतकी आहे. तर पत्नीच्या नावे पिंपळगाव येथे सुमारे अडीच एकर जमीन असून त्याची किंमत ४५ लाख ६१ हजार इतकी आहे. तर रविवारपेठ, मंगळवार पेठ आणि कसबा पेठ येथे संयुक्त मिळकती आहेत. धंगेकर यांच्या पत्नीकडे २ कोटी ६० लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.