मिलिंद देवरा यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश; दक्षिण मुंबईत शिंदेंची ताकद वाढली

मागील अर्थशतकांहून अधिक काळ कॉंग्रेससोबत असलेल्या मिलिंद देवरा यांनी रामराम ठोकला असून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

    मुंबई : कॉंग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा(Milind Deora) यांनी शिवसेना (शिंदे गट) (Shivsena) मध्ये प्रवेश केला आहे. यामुळे मुंबईतील (Mumbai) राजकारणामध्ये मोठा बदल झाला आहे. मागील अर्थशतकांहून अधिक काळ कॉंग्रेससोबत (congress) असलेल्या मिलिंद देवरा यांनी रामराम ठोकला असून एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी मी आज अत्यंत भावूक असल्याचे देखील मिलिंद देवरा यांनी सांगितले आहे.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मिलिंद देवरा यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी मिलिंद देवरा यांच्यासोबत अनेक कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. यासोबत मुस्लीम समाज, मारवाडी समाज व व्यापारी वर्गाने मोठ्या प्रमाणामध्ये शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यामुळे आगामी निवडणूकांच्या आधी एकनाथ शिंदे यांची दक्षिण मुंबईमध्ये शक्ती वाढली आहे.

    यावेळी मिलिंद देवरा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “मी खूप भावूक आहे. मी काँग्रेस पक्ष सोडेन असं कधी वाटलं नव्हतं. पण, काँग्रेस पक्षाशी 55 वर्षे असलेले नाते मी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली संपवत आहे. माझे राजकारण नेहमीच सकारात्मक राहिलं आहे. माझी विचारधारा मुंबई, महाराष्ट्र आणि देशातील नागरिकांची सेवा करण्य़ाची आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मेहनती आणि कायम सर्वांसाठी उपलब्ध असतात. जनतेच्या वेदना ते जाणून घेतात. म्हणून त्यांचे हात मला आणखी बळकट करायचे आहेत. शिवसेनेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचेही हात मला बळकट करायचे आहेत.” अशी भावना पक्षप्रवेश करणाऱ्या मिलिंद देवरा यांनी व्यक्त केली.