कॉंग्रेस स्टार प्रचारक प्रियांका गांधी येणार पुण्यात; पीएम मोदींनंतर करणार दौरा

कॉंग्रेस नेत्या आणि स्टार प्रचारक प्रियांका गांधी देखील पुण्यामध्ये सभा घेणार आहेत.

    पुणे – लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्वच पक्षाकडून जोरदार प्रचार आणि सभा यांचा धडाका लावला जात आहे. पुण्यामध्ये देखील लोकसभा निवडणूकीला रंगत आलेली आहे. भाजप पक्षश्रेष्ठींची पुण्यामध्ये सभा होत असताना आता कॉंग्रेस पक्षश्रेष्ठी देखील पुण्यामध्ये हजेरी लावणार आहे. कॉंग्रेस नेत्या आणि स्टार प्रचारक प्रियांका गांधी देखील पुण्यामध्ये सभा घेणार आहेत. त्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष पहायला मिळत आहे.

    मीडिया रिपोर्टनुसार, प्रियांका गांधी या लवकरच पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर काहीच दिवसांत काँग्रेसकडून पुण्यात रॅली आणि सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुणे जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीच्या समर्थनार्थ प्रियांका गांधी यांचा दौरा असणार आहे. काँग्रेसच्या स्टार प्रचारक प्रियांका गांधी यांच्यासह सचिन पायलट हे देखील त्यांच्यासोबत सभेला उपस्थित राहणार आहेत.

    भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील पुण्यामध्ये येणार आहे. येत्या २९ एप्रिल रोजी नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचे भाषण देखील होणार आहे. त्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये प्रियांका गांधी देखील पुण्यात येणार आहेत. त्यामुळे पुण्याच्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराला आणखी रंगत येणार आहे.