काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण महामोर्चात सहभागी होणार नाहीत! ट्विट करून सांगितले कारण

    मुंबई : राज्यातील विविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडी आक्रमक झाली असून आज मुंबईत राज्यसरकार विरोधात महामोर्चा काढण्यात येणार आहे. महाविकास आघाडी पक्षातील सर्व बडे नेते तसेच पक्षाचे कार्यकर्ते मोठया संख्येने या मोर्चासाठी उपस्थित राहणार असून मागील अनेक दिवसांपासून या विराट मोर्चाची तयारी सुरु आहे. मात्र असे असतानाच काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण हे मात्र या महामोर्चाला अनुपस्थित राहणार आहेत. अशोक चव्हाण यांनी ट्विट करून यामागचे कारण स्पष्ट केले आहे.

    काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी ट्विट करून आज होणाऱ्या महाविकास आघाडीच्या मुंबई येथील नियोजित मोर्चाला पाठिंबा असल्याचे सांगितले आहे. मात्र चव्हाण एका निकटवर्तीय कुटुंबातील नांदेड येेथे पूर्वनियोजित विवाह सोहळ्यामुळे ते मोर्चात सहभागी होणार नाहीत. मात्र त्यांच्या पत्नी माजी आमदार अमिता चव्हाण या मोर्चाला उपस्थित राहातील असे चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.

    आज सकाळी १०:३० वाजल्यापासून या मोर्चाची सुरुवात भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनीपासून होणार असून बोरीबंदर येथील टाईम्स ऑफ इंडियाच्या बिल्डिंगजवळ हा मोर्चा थांबणार आहे. या मोर्चाच्या अनुषंगाने वाहतूक व्यवस्थेत अनेक बदल करण्यात आले असून हे बदल सायंकाळपर्यंत कायम असणार आहे.