भाजपाचा जाहीरनामा म्हणजे ‘फेकूनामा अन् चुनावी जुमला’; नाना पटोले यांचा घणाघात

कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील भाजपच्या जाहीरनाम्यावर टीकास्त्र डागलं असून भाजपचा जाहीरनामा हा फेकूनामा आहे असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.

    नागपूर – लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. २०२७ पर्यंत भारताला विकसित देश बनवायचे आहे, हा संकल्प लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्प पत्रात अनेक उपाययोजना मांडण्यात आल्या आहेत. भाजपकडून याचा जोरदार प्रचार केला जात असला तरी विरोधकांकडून तीव्र शब्दांत टीका केली जात आहे. कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील भाजपच्या जाहीरनाम्यावर टीकास्त्र डागलं असून भाजपचा जाहीरनामा हा फेकूनामा आहे असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.

    ‘चुनावी जुमलेबाजी’ला जनता फसणार नाही

    नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला. नाना पटोले म्हणाले की, मोदी सरकारने मागील १० वर्ष फक्त अदानीसाठी काम केले, हे सरकारच अदानी सरकार होतं. पण जाहीरनाम्यात अदानीचा हिस्सा असायला हवा होता ते मात्र दिसत नाही. समान नागरी कायद्याचे आश्वासन तर मागील निवडणुकीतही दिले होते मग आतापर्यंत भाजपाने त्याची अंमलबजावणी का केली नाही, त्यांना कोणी रोखले होते का? वन नेशन, वन इलेक्शन म्हणजे पुन्हा निवडणुकाच घेणार नाही असे आहे. 2014  व 2019 मध्ये भाजपाने जे सांगितले तेच मुद्दे आजच्या जाहीरनाम्यात आहेत. जनता आता भाजपाच्या फसव्या आश्वासनांना बळी पडणार नाही. जनता आता भाजपाच्या या ‘चुनावी जुमलेबाजी’ला फसणार नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपाला घरी बसवण्याचा संकल्प जनतेने केला आहे, अशा शब्दांत नाना पटोले यांनी भाजप व नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

    गडकरींनी महिला वर्गाचा अपमान केला

    भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, केंद्रीय मंत्री आणि कायमचे भावी पंतप्रधान नितीन गडकरी यांनी चंद्रपूरातील सभेत खालची पातळी गाठली. आमचा उमेदवार शिलाजित खाल्लेला पैलवान आहे, असे विधान करून गडकरींनी महिला वर्गाचा अपमान केला आहे. शिलाजित कशासाठी खातात हे नितीन गडकरींनी सांगावे. महिलांचा अपमान करणाऱ्या नितीन गडकरी यांनी माफी मागितली पाहिजे असे देखील नाना पटोले म्हणाले आहेत.