सनातन संस्था ही दहशतवादी संस्था; पृथ्वीराज चव्हाण यांचे विधान चर्चेत

सनातन ही दहशतवादी संघटना असल्याचं आमचं आजही म्हणणं आहे असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

    पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात तब्बल 11 वर्षांनंतर निकाल लागला आहे. पुणे विशेष न्यायालयाने दिलेल्या या निकालाचे अनेकांनी स्वागत केले आहे. या प्रकरणातील पाच आरोपींपैकी दोघांना न्यायालयाने सश्रम जन्मठेप दिली आहे. तर इतर तिघांना अपुऱ्या पुराव्यामुळे निर्दोष मुक्तता दिलेली आहे. या निकालानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सनातन ही दहशतवादी संघटना असल्याचं आमचं आजही म्हणणं आहे असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.

    नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील निर्णयावर पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल 11 वर्षांनी लागला. पोलिसांनी पुरावा सादर न केल्याने तिघांना सोडण्यात आलं. हा एक कट होता. त्यात कोण सामील होतं हे समोर आलेलं नाही. सनातन संस्थेचे लोक कटात सहभागी होते, असं म्हटलं होतं. सनातन संस्थेच्या प्रवक्त्याचं वक्तव्य ऐकलं. हा कट कुठे शिजला? मुख्य सूत्रधार कोण ते समजलेलं नाही, सगळं दडपण्यात आलं आहे असं मला वाटतं. सनातन संस्थेच्या तारा कुठे जुळतात ते समोर आलं नाही का? ज्या प्रवृत्तींनी गांधींचा खून केला त्याच प्रवृत्तींनी दाभोलकरांचा खून केला हे मी आधीही म्हणालो होतो आणि आत्ताही म्हणतो आहे. असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

    पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले, “सनातन संस्था ही दहशतवादी संस्था आहे असं माझं मत आहे. मी मुख्यमंत्री असताना सनातन संस्थेवर देशव्यापी बंदी आणा अशी मागणी आम्ही तेव्हा गृहमंत्रालयाकडे केली होती. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होण्याच्या दोन वर्ष आधी ही बंदी घालण्याची मागणी आम्ही केली होती. तसंच नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर पुन्हा एकदा पत्र लिहिलं होतं. सनातन संस्थेचा सहभाग नेमका कसा होता ते स्पष्ट झालेलं नाही. सनातन संस्थेवर बंदी घालावी ही मागणी अजूनही केंद्राकडे प्रलंबित आहे. दाभोलकर प्रकरणात जो निकाल देण्यात आला त्यावर मी समाधानी नाही.” असे ठाम मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

    निकालावर समाधान व्यक्त करण्यासारखं काहीही नाही

    “दोन लोकांनी हे मान्य केलं आहे की, आम्ही दाभोलकरांना गोळ्या घातल्या त्यांनाच शिक्षा झाली. नंतर देखील गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी यांची हत्या झाली. त्यामुळे तपास योग्य झाला नाही. या चौकशीबाबत समाधान व्यक्त करण्याची कुठलीही गरज नाही”, अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली.