
सत्ता प्राप्तीसाठी खाली केलेले खोके पुन्हा भरण्यासाठी स्पर्धा परीक्षेचे पेपर फुटले का? असा सवाल करत विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.
संभाजीनगर : सत्ता प्राप्तीसाठी खाली केलेले खोके पुन्हा भरण्यासाठी स्पर्धा परीक्षेचे पेपर फुटले का? असा सवाल करत विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत सरकारवर निशाणा साधला. यासाठी त्यांनी राज्य सरकारच्या विविध खात्यातील नोकरभरतीच्या पेपर फुटीची उदाहरणे दिली.
यामध्ये मुंबई पोलीस भरती, वन विभाग नोकरभरती, तलाठी परीक्षेतील पेपर फुटीची उदाहरणे दिली. वडेट्टीवार म्हणाले की, खोके देऊन पक्ष फोडा, आता खाली खोके पुन्हा भरण्यासाठी नवीन मार्ग शोधा हेच राज्यात सुरू असलेल्या पेपर फुटी मागचे कारण असू शकते असे वाटत आहे. तलाठी भरती, मुंबई पोलीस भरती, वन विभाग भरती असे तीन महत्वाच्या परीक्षांचे पेपर फुटतात कसे?
ईडी, सीबीआय अशा कार्यतत्पर संस्था असूनही आरोपी सापडत नाही. त्यामुळे सदर पेपर फुटी रॅकेटला कोणत्या महाशक्तीचा आशीर्वाद असेल हे तरुणांना कळले आहे. त्यामुळेच त्यांनी या सर्व घोटाळ्यांची न्यायालयीन देखरेखीखाली एसआयटी मार्फत चौकशी करण्याची आणि तत्काळ फेरपरीक्षा घेण्यात यावी, या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या मागणीला आमचा पाठिंबा आहे, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.