राज्यातील जनतेसाठी काँग्रेस नेते सरसावले; महाराष्ट्र दौऱ्यावर असताना करणार नुकसानग्रस्त भागांची पाहणी

काँग्रेसचे नेते राज्याच्या दौऱ्यावर जाणार असून, ते शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली. अवकाळी पावसाने केलेल्या शेती व फळबागांच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने नेत्यांवर जबाबदारी सोपवली.

    मुंबई : काँग्रेसचे नेते राज्याच्या दौऱ्यावर जाणार असून, ते शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी (Inspection of Damaged Areas) करणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली. अवकाळी पावसाने केलेल्या शेती व फळबागांच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने नेत्यांवर जबाबदारी सोपवली असून, काँग्रेस पक्षाचे ३४ नेते ३४ जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करणार आहेत.

    नाशिक जिल्ह्याची जबाबदारी विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे दिली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे नांदेड, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे नागपूर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पुणे, माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांना ठाणे, माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील छत्रपती संभाजीनगर जिल्हा, प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे लातूर, प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील अहमदनगर, माजी मंत्री सुनिल केदार वर्धा पाहणी करणार आहेत.

    या सर्व नेतेमंडळींकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली. नाना पटोले यांनी नुकसानग्रस्त पाहणी दौऱ्यासाठी नेत्यांना जिल्हावार जबाबदारी दिली आहे.